पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड खैरनार, गोविंद राघो चालतात याचा प्रत्यय त्या ठिकाणी आला. परंतु नंतर योग्य पोलीस अधिकारी सदर विभागात बदलून आल्यावर हीच कार्यवाही कमीतकमी पोलीस ताफा व म.न.पा. कर्मचार्‍यांच्या मदतीने चार ते पाच तासांत निकालात निघाली. सदर फेरीवाल्यांनी खैरनार यांच्या घरासमोर कारवाईच्या निषेधार्थ रोज रात्री अकरा वाजेपर्यंत मोर्चा नेण्याचे उद्योग साधारण आठ-दहा दिवस केले. नंतर पालिकेच्या कार्यालयात बैठक चालू असताना घुसून तोडफोड, तसेच सामानाची फेकाफेकी करण्याचे विध्वंसक कृत्य केले. सदर परिस्थितीतही स्वत:चा व सहकार्‍यांचा बचाव करण्यासाठी प्रसंगी आक्रमकता दाखवून समोरच्याचे मनोबल खच्ची करून त्या परिस्थितीवर खैरनार यांनी विजय मिळवला. शीव (सायन) रस्ता रुंदीकरण या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेवर अनधिकृत मटका व्यवसाय, मच्छी मार्केट, मंदिर, इत्यादींवर त्यांनी योग्य कारवाई केली. त्या ठिकाणी मोठा व लांब सिमेंटचा रस्ता तयार झाला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातेवाईक, चंद्रकांत पाटील यांचे अनधिकृत हॉटेल त्यांनी पोलिसांच्या मदतीने जमीनदोस्त केले. शिवाजी पार्कवरील बेकायदा धार्मिक स्थळे, धारावी येथील कुख्यात ‘डॉन’ दाऊद इब्राहिमची मेहजबिन इमारत, भेंडीबाजार, मुसाफिर खाना, अशा अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामविरोधात कारवाया करण्यात खैरनार यांचा पुढाकार होता. पैकी काही कारवाया यशस्वी झाल्या, तर काही राजकीय हस्तक्षेपामुळे अयशस्वी ठरल्या. खैरनार यांची १जानेवारी१९८८ पासून उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली. वरील प्रकारच्या अतिक्रमणविरोधी कारवायां-बरोबरच पालिका कर्मचार्‍यांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करणे, राजकीय भ्रष्टाचारी अधिकारी, तसेच कुविख्यात गुंडाना टक्कर देणे, विविध प्रकारचे भ्रष्टाचार जवळून पाहणे व शक्य तेथे विरोध करणे, दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेल्या वेश्यांची कुंटणखाण्यातून सुटका व पुनर्वसन करणे असे अनेक प्रकारचे कार्य खैरनार यांच्या नावावर जमा आहे. अशा प्रकारच्या नि:स्पृह, नि:स्वार्थी व कर्तव्यतत्पर अधिकार्‍यास समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिलेला आहे, तसेच वृत्तपत्रांनीही त्यांच्या कामाची योग्य दखल वेळोवेळी घेतलेली आहे. तरीही आपल्या देशात अशा अधिकार्‍यास २९जून१९९४ पासून महापालिका सेवेतून राजकीय आकसाने तांत्रिक कारण दाखवून निलंबित करण्यात आले. निलंबनानंतरही त्यांची भ्रष्टाचाराविरोधी वैयक्तिक लढाई चालूच राहिली. देशव्यापी, राज्यव्यापी, व्याख्यान दौरे, तसेच अनेक सभा-संमेलने या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचारविरोधी व्यापक जनआंदोलन लढा चालू ठेवला. - वसुधा कानडे संदर्भ : १. खैरनार, गो. रा., ‘एकाकी झुंज’, (आत्मचरित्र); पुष्प प्रकाशन लि.; प्रथमावृत्ती, नोव्हेंबर १९९८; रॉयल एडिशन, ऑगस्ट १९९९

शिल्पकार चरित्रकोश २०५