पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ ते | औ । ओंबळे, तुकाराम गोपाळ प्रशासन खंड त्यामुळेच २६/११ च्या हल्ल्याच्या खटल्यातील चौकशी व तपासाचे मार्ग सुलभ झाले. पण या हातघाईत तुकाराम ओंबळे मात्र गिरगाव चौपाटीजवळ आपल्या प्राणांचे बलिदान करून हुतात्मा झाले. उण्यापुर्‍या सहा मिनिटांच्या ह्या कल्पनेहूनही थरारक घटनेमध्ये एरवी अन्य सर्व दहशतवाद्यांप्रमाणेच कसाबलाही पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यूचा मार्ग दाखविता आला असता; परंतु त्यामुळे ह्या कटाची व पाकिस्तानच्या कुटिल कारवायांची माहिती जगाला कधीच कळली नसती. ओंबळेंमुळेच कसाब जिवंत सापडू शकला व पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. ओंबळेंच्या ह्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना २००९च्या प्रजासत्ताक दिनी ‘अशोकचक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आले. ह्या वेळी बोलताना भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती प्रतिभाताई देवीसिंग पाटील ह्यांनी असे प्रशंसोद्गार काढले, की “कोणत्याही शस्त्राविना दहशतवाद्यांवर तुटून पडणारे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय शौर्याला माझा सलाम आहे.” ओंबळेंची सेवा अजून साडेचार वर्षे शिल्लक होती. त्यांच्या पश्चात पत्नी ताराबाई, तसेच चार कन्या असा परिवार आहे. - संदीप राऊत

१७८ शिल्पकार चरित्रकोश