पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ ते | औ । एडवर्डस, स्टीफन मेरिडिथ प्रशासन खंड मॉरिसन समितीचे ते सदस्य होते. या समितीने भविष्यातील या व्यवस्थेच्या कार्यपद्धतीबाबत सरकारला अहवाल सादर केल्यावर एडवर्ड्स हे इंग्लंड येथे निघून गेले. इंग्लंड येथे असतानाच त्यांना मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नेमणुकीचे पत्र मिळाले. त्यांना इंग्लंड येथील स्कॉटलंड यार्ड येथे जाऊन तेथील लंडन पोलिसांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे एडवर्ड्स यांनी गुन्हा शोधण्यातील पोलिसांची कार्यपद्धती, त्यांचे विविध विभाग, त्यांना दिले जाणारे दैनंदिन काम याचा अभ्यास केला. तसेच वेस्टमिनिस्टर येथील हवालदारांचे प्रशिक्षण विद्यालय, ठसे तपासणी कार्यालय व विविध ठिकाणांतील पोलीस स्थानकांचासुद्धा अभ्यास केला. त्यानंतर एडवर्ड्स यांनी मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. तेव्हा या ठिकाणी पोलीस कार्यालयाच्या जागेपासून ते सर्व प्रकारच्या रचनांपर्यंत गोंधळ होता. त्यांनी पहिल्याप्रथम जून १९०९ मध्ये गुन्हा अन्वेषण विभागाची स्थापना केली. त्यामध्ये चार विभाग होते. राजकीय, विदेश, गुन्हा व अन्य. त्या वेळेस या विभागाच्या कार्यातील एक भाग म्हणजे संवेदनशील अशा राजकीय व धार्मिक गोष्टींची छाननी करणे. गणपती उत्सव व मेळ्याच्या ठिकाणी म्हटली जाणारी गीते यांच्यावर बारीक लक्ष ठेवले जाई. गुन्हा अन्वेषण विभागाखेरीज आता पोलिसांत कायमच्या संस्था बनलेल्या अनेक गोष्टींची सुरुवात ही एडवर्ड्स यांनी केली. १९११ मध्ये त्यांनी पोलीस वृत्तपत्र (गॅझेट) सुरू केले. हे अंतर्गत वितरणासाठी होते व त्यामधून पोलिसांना गुन्हेविषयक सर्व बातम्या कळत, तसेच पोलीस विभागात इतर ठिकाणी चालू असलेल्या घडामोडीबाबतही माहिती कळे. त्यांनी नवीन पोलीस स्थानकांची रचना केली. त्यांमध्ये आधुनिक यंत्रणा बसविली, तसेच प्रशिक्षित कर्मचारीवर्गही नेमला. तसेच गुन्ह्याच्या नोंदींची पुस्तिका, माहितीचे कागद, वेळापत्रक, इंग्रजी बोलणारा एखादा अधिकारी अशीही व्यवस्था त्यांनी सुरू केली. मुंबईतील कुलाबा, भायखळा व नागपाडा येथील पोलीस स्थानकांची पुनर्रचना ही लंडन येथील पोलीस स्थानकांच्या पद्धतीने केली गेली. एडवर्ड्स यांनी पोलीस कार्यपद्धतीत रात्रपाळी व दिवसपाळीही सुरू केली, तसेच उपनिरीक्षक पदावर लोकांमधून उमेदवार निवडून थेट नेमणूक करण्याची पद्धत सुरू केली. त्या वेळेस रस्त्यावर राहणार्‍या अल्पवयीन मुलींना पोलीस बरेच वेळा पकडून पोलीस स्थानकात आणत असत; कारण त्यांना रस्त्यावर बेवारस सोडून दिल्यास त्या वाममार्गाला लागण्याची शक्यता असे. म्हणूनच एडवर्ड्स यांनी पुढाकार घेऊन अब्दुल्लाह हाजी दाऊद बावला मुहम्मदन मुलींचे अनाथगृह सुरू केले. अब्दुल्लाह हाजी यांनी तीन लाख रुपये देणगी दिल्याने त्यांचे नाव या अनाथगृहास देण्यात आले. आज त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे. एडवर्ड्स यांनी विपुल लेखन केले. एडवर्ड्स यांचे एक प्रमुख योगदान म्हणजे त्यांनी मुंबईच्या इतिहासाचे दस्तऐवज नोंदीकरण (डॉक्युमेंटेशन) केले. त्याचा पुढे अनेकजणांना संशोधनासाठी खूप उपयोग झाला. त्यांनी ‘द राइझ ऑफ बॉम्बे : अ रेस्ट्रोस्पेक्ट’ हे पुस्तक लिहिले, तसेच जुनागड व काठियावाड येथील राजांवर ‘बायबेज् ऑफ बॉम्बे’ या पुस्तकाचे सहलेखन केले. आणखीन एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘द बॉम्बे सिटी पोलीस, अ हिस्टॉरिकल स्केच’ (१६७२-१९१६) लिहिले. मुंबई पोलिसांबद्दलचा हा सर्वांत वास्तवदर्शी व आकर्षक वृत्तान्त मानला जातो. याशिवाय ‘सर दिनशॉ पेटीट - अ मेमॉइर’ व ‘बाबर’ ही दोन पुस्तकेही एडवर्ड्स यांनी १९२४ मध्ये लिहिली. सात वर्षांच्या सेवेनंतर, प्रकृती-अस्वास्थ्यामुळे ते १५ एप्रिल १९१६ मध्ये मुंबई पोलीस आयुक्त पद सोडून, इंग्लंडला परत गेले. - आशा बापट

१७६ शिल्पकार चरित्रकोश जाई,