पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुल्ला, दिनशा फरदूनजी न्यायपालिका खंड न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. ३जुलै१९६६ रोजी मुदतीपूर्वीच राजीनामा देऊन ते निवृत्त झाले. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, या दोन्ही न्यायालयांत न्या.मुधोळकर यांचा एकेका अत्यंत महत्त्वाच्या घटनात्मक खटल्याच्या निर्णयात सहभाग होता. नानावटी प्रकरणातील मूळच्या फौजदारी खटल्यानंतर उद्भवलेल्या घटनात्मक प्रश्नाच्या निर्णयासाठी मुंबई उच्च न्यायालयात पाच न्यायाधीशांचे जे विशेष पूर्णपीठ स्थापन झाले होते, त्याचे न्या.मुधोळकर एक सदस्य होते. या पीठाचा एकमताचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा निर्णय मानला जातो. नंतर सर्वोच्च न्यायालयात संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराच्या व्याप्तीच्या मुद्द्यावरच्या सज्जनसिंह खटल्यातील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाचेही न्या. मुधोळकर सदस्य होते. या खटल्यात न्या.मुधोळकर आणि न्या.हिदायतुल्ला यांनी वेगळी निकालपत्रे लिहून काही मुद्द्यांवर बहुमताच्या निर्णयाशी असहमती व्यक्त केली. (बहुमताचे निकालपत्र सरन्यायाधीश प्र.बा.गजेंद्रगडकर यांनी लिहिले होते.) न्या.मुधोळकर भारतीय प्रेस परिषदेचे (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया) पहिले अध्यक्ष होते. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. बॉम्बे लॉ रिपोर्टर, १९६१.

मुल्ला, दिनशा फरदूनजी ज्येष्ठ वकील आणि न्यायविद १८ एप्रिल १८६८ - २७ एप्रिल १९३४ दिनशा फरदूनजी मुल्ला यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे शालेय शिक्षण सर जे.जे. पारशी बेनेव्होलंट इन्स्टिट्यूशनमध्ये झाले. मॅट्रिकची परीक्षा ते वयाच्या चौदाव्या वर्षी उत्तीर्ण झाले. एल्फिन्स्टन महाविद्यालयातून १८८६ मध्ये ते इतिहास आणि राज्यशास्त्र घेऊन बी.ए. आणि १८८८ मध्ये इंग्रजी आणि फारसी घेऊन एम.ए. उत्तीर्ण झाले. त्यांना एल्फिन्स्टन महाविद्यालयातच दोन वर्षांसाठी फारसीची फेलोशिप मिळाली. त्यात ते नवागत विद्यार्थ्यांना फारसी शिकवीत असत. नंतर १८९२ मध्ये त्यांनी एलएल.बी. ची पदवी प्रथम वर्गात मिळविली आणि त्यांना जज् स्पेन्सर पारितोषिक मिळाले. १८९५ मध्ये ते सॉलिसिटरची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सॉलिसिटर म्हणून व्यवसायास सुरुवात केली. त्यावेळी हिरालाल सरैया हे त्यांचे भागीदार होते. नंतर त्यांनी मुल्ला अँड मुल्ला या सुप्रसिद्ध फर्मची स्थापना केली. १९०० मध्ये मुल्ला यांची मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९०३ ते १९०९ पर्यंत ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. हे पद मिळविणारे ते पहिले सॉलिसिटर. त्यांची प्राचार्यपदाची कारकीर्द अतिशय यशस्वी झाली. दरम्यान, त्या काळच्या नियमानुसार मुल्ला यांनी आपली प्रॅक्टिस एक वर्षभर स्थगित ठेवली आणि १९०८ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत अ‍ॅडव्होकेट म्हणून रुजू झाले. त्यांचे कायद्याचे आणि न्यायालयीन निर्णयांचे (केस लॉ) ज्ञान विलक्षण होते. १९१५ मध्ये त्यांची जमीन-अधिग्रहण प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी स्थापन झालेल्या अपील न्यायाधिकरणाच्या (ट्रायब्युनल ऑफ अपील) अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या पदावरील त्यांची सहा वर्षांची कारकीर्दही अतिशय यशस्वी झाली. १९२२ मध्ये काही काळ त्यांनी मुंबई प्रांताचे अ‍ॅडव्होकेट-जनरल म्हणून काम पाहिले, तर नंतर काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून. या अल्पकालीन नियुक्तीतही एक आदर्श न्यायाधीश म्हणून त्यांचा लौकिक झाला. १९२८ मध्ये मुल्ला | म | शिल्पकार चरित्रकोश