पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

न्यायपालिका खंड मंडलिक, विश्वनाथ नारायण मंडलिक, विश्वनाथ नारायण रावसाहेब मंडलिक ज्येष्ठ न्यायविद आणि वकील ८ मार्च १८३३ - ९ मे १८८९ ऋ मुख्य नोंद - राजकारण खंड रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड येथे झाला. त्यांचे आजोबा धोंडदेव हे दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे सासरे होते. पेशव्यांनी सांगितल्याने त्यांनी कुवेशीकर परांजपे घराण्यातील मोरूभाऊ परांजपे यांचा मुलगा दत्तक घेतला. दत्तकविधानानंतर त्याचे नाव नारायण असे ठेवण्यात आले. या नारायण मंडलिकांच्या आठ अपत्यांपैकी विश्वनाथ हे तिसरे होत. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत विश्वनाथ यांचे घरीच शिक्षण झाले. नंतर १८४५ ते १८४७ अशी दोन वर्षे इंग्रजी शिक्षणासाठी त्यांना रत्नागिरीस पाठविण्यात आले. त्यानंतर सुमारे सव्वाचार वर्षे त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये त्यावेळी उपलब्ध असलेले उच्च शिक्षण घेतले. (मुंबई विद्यापीठाची स्थापना अजून व्हावयाची होती.) पहिल्या वर्षापासून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. शेवटच्या परीक्षेत ते अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र, नीतिशास्त्र, साहित्य, इतिहास, रसायनशास्त्र आणि देशी भाषा या सर्व विषयांत वेगवेगळे आणि एकंदरीत परीक्षेतही पहिले आले. शिक्षण संपल्यावर लगेच मंडलिकांना सरकारी नोकरी मिळाली. १८५२ ते १८५४ या काळात ते भुज येथे कच्छच्या पोलिटिकल एजंटच्या कचेरीत मुख्य हिशेब तपासनीस होते. तेथील हवा न मानवल्याने त्यांनी तेथून बदली मागितली, त्यामुळे कराची येथे सिंधच्या कमिशनरचे खासगी सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जुलै १८५४ ते सप्टेंबर १८५५ पर्यंत ते कराचीला होते. या अवधीत त्यांनी फारसी आणि सिंधी भाषांचा अभ्यास केला. सप्टेंबर १८५५ पासून ते ठाणे येथे शाळा खात्यात डेप्युटी इन्स्पेक्टर किंवा व्हिजिटर म्हणून काम करू लागले. याचवेळी त्यांना रावसाहेब हा किताब देण्यात आला. नंतर १८५८ मध्ये सहा महिने वसईला मुन्सिफ, १८५९ मध्ये सरकारी बुक डेपोचे क्युरेटर आणि १८६० ते १८६३ पर्यंत इन्कम टॅक्स कमिशनरचे सहायक, अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर मतभेद व गैरसोयींमुळे रावसाहेबांनी नोव्हेंबर १८६२मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा दिला; तो फेब्रुवारी १८६३मध्ये मंजूर झाला. राजीनामा दिल्याबरोबरच त्यांनी वकिलीच्या परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला होता. एप्रिल १८६३मध्ये ते वकिलीची म्हणजे ‘हायकोर्ट प्लीडर’ ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत वकिलीस सुरुवात केली. यादरम्यान थोडे दिवस त्यांनी कापूसबाजारात आणि शेअर बाजारात व्यापार करून पाहिला. अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता, कमालीची सचोटी आणि प्रामाणिकपणा, काटेकोर शिस्त आणि वक्तशीरपणा या रावसाहेबांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे ते अल्पावधीतच अपील शाखेतील बिनीचे वकील बनले. एकीकडे त्यांच्या अशिलांमध्ये अनेक जहागिरदार, सरदार, शिल्पकार चरित्रकोश १०१