पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/५१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज जोशी, शरद अनंत समितीचा अहवाल 'राष्ट्रीय कृषिनीती' या नावाने जोशी यांनी सादर केला. त्यातील तरतुदी बघितल्यास त्यांच्या दूरदृष्टीची आजही जाणीव होते. पुढे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कृषी कार्यबलाच्या अध्यक्षपदावरही शरद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. जनता दलाच्या चिन्हावर १९९०च्या विधानसभा निवडणुका शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी लढवल्या होत्या. त्यापैकी पाच जण विधानसभेवर आमदार म्हणून निवडूनही आले. याच पाच सहकाऱ्यांसह आणि इतर असंख्य कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर १९९४मध्ये शरद जोशी यांनी स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. शरद जोशी यांनी १९९५ मध्ये हिंगणघाट (वर्धा), बिलोली (नांदेड) या दोन मतदारसंघातून विधानसभेची, तर १९९६मध्ये नांदेड मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यांना अपयश स्वीकारावे लागले. डाव्या / समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना १९९० मध्ये डंकेल प्रस्तावाला जोरदार समर्थन देण्याची त्यांची भूमिका पटली नाही. शेतकऱ्याचे भले खुल्या व्यवस्थेत आहे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. कुठलाच पक्ष खुलेपणाने जागतिकीकरणाचा स्वीकार करण्यास तयार नसताना त्यांनी दूरदृष्टीने हे समर्थन केले. खुल्या व्यवस्थेविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी त्यांनी 'स्वतंत्रतेची मूल्ये' या नावाने चार लेख लिहिले. हे लेख म्हणजे त्यांच्या संपूर्ण विचारसरणीची पायाभूत मांडणी आहेत. स्वतंत्रतावाद हा शेतकरी संघटनेच्या विचारसरणीचा पाया आहे. 'नियोजन व्यवस्थेचा सर्वात क्रूर बळी शेतकरी ठरला व स्वतंत्रतावादाचा झेंडा सरसावून शेतकरी बाहेर पडले. जगभर बळीराजाची द्वाही फिरत आहे. भारतात मात्र अजूनही स्वकर्तृत्वावर उभे राहण्याची हिम्मत नसलेले आणि सरकारी दक्षिणांना चटावलेले पुढारी त्याला विरोध करू पाहात आहेत' अशा नेमक्या शब्दांत शेतकरी आंदोलनाचे वैचारिक स्वरूप त्यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात कृषी कार्यबलाचे अध्यक्ष म्हणून शरद जोशी यांना केंद्रीय मंत्र्याचा दर्जा १४२ कृषी खंड देण्यात आला होता. या काळात 'स्वतंत्र भारत पक्ष' सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झाला. शरद जोशी २००४-२०१० या काळात राज्यसभेत खासदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलताना मांडलेली मते लक्षणीय म्हणून कामकाजात नोंदवली गेली आहेत. खुल्या व्यवस्थेचा स्वीकार केल्यानंतरही शेती क्षेत्रात मात्र ती पूर्णपणे येऊ दिली गेली नाही, याबद्दल शरद जोशींनी आणि शेतकरी संघटनेने सातत्याने आवाज उठवला आहे. कापसाच्या निर्यातबंदीवर अतिशय तीव्र प्रतिक्रिया संघटनेने नोंदवताच केंद्र शासनाला आठवड्याच्या आत बंदी उठवावी लागली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभलेले स्वतंत्र भारतातील हे एकमेव आंदोलन आहे व त्याचे नेतृत्व जोशी यांनी समर्थपणे केले आहे. 'भीक नको हवे घामाचे दाम' या घोषणेतच संघटनेच्या कामाचा आवाका लक्षात येतो. शरद जोशी यांनी 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती', 'प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश', 'शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख', 'चांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न', 'स्वातंत्र्य का नासले', 'खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने', 'अंगारमळा', 'जग बदलणारी पुस्तके', 'अन्वयार्थ - भाग १'; 'अन्वयार्थ - भाग २ ' ; 'माझ्या शेतकरी भावांनो मायबहिणींनो'; 'अर्थ तो सांगतो पुन्हा'; 'बळीचे राज्य येणार आहे'; 'पोशिद्यांची लोकशाही' या पंधरा पुस्तकांमधून अतिशय सोप्या भाषेत आपल्या स्वतंत्र विचारांची मांडणी करून ठेवली आहे. जोशी यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली म्हणून १० नोव्हेंबर २०१० रोजी शेगाव येथे त्यांच्या अमृत महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या वेळी स्वागत वा हार-तुरे त्यांनी न स्वीकारता ज्येष्ठ वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या हस्ते एक मानपत्र स्वीकारले. सामान्य शेतकऱ्यांनी त्यांचा गौरव केला यातच त्यांना आनंद मिळाला. या मेळाव्याला लाखो शेतकऱ्यांनी उपस्थिती लावून या शेतकरी नेत्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. श्रीकांत अनंत उमरीकर

शिल्पकार चरित्रकोश