Jump to content

पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/७७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरदेसाई, रघुनाथ गोविंद
साहित्य खंड
 

रियासतीमध्ये (तेरा खंड) इ. स. १६०० ते १८१८ पर्यंतचा २०० वर्षांचा कालखंड, तर ब्रिटिश रियासतीमध्ये (दोन खंड) इ. स. १४९८ ते १८५८ असा २५० वर्षांचा कालखंड समाविष्ट केलेला आहे. वेगवेगळ्या राजवटींचे भारताच्या अर्थकारण, राजकारण व समाजकारण यांवर झालेले परिणाम त्यांनी विस्तृतरीत्या नोंदवले आहेत.
 रियासतीबरोबरच 'न्यू हिस्टरी ऑफ महाराष्ट्र', 'मेन करंट्स ऑफ मराठा हिस्टरी' असे इंग्रजी ग्रंथ; 'पेशवे दप्तर' (पंचेचाळीस खंड), 'पूना रेसिडन्सी कॉरस्पॉण्डन्स' (पाच खंड) असे संशोधित व संपादित, सुमारे १०५ ग्रंथ आणि २७५ लेख, शिवाय इंग्लंड देशाचा विस्तार ('एक्सपॅन्शन ऑफ इंग्लंड' - जॉन सीली) व राजधर्म ('प्रिन्स' - मॅकिएव्हेली) हे दोन भाषांतरित ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत.
 हिन्दुस्थानच्या अर्वाचीन इतिहासाविषयी सखोल संशोधन आणि लेखन केल्यामुळे गो. स. सरदेसाई याच्या नावामागे 'रियासतकार' सरदेसाई ही उपाधी जोडली गेली आहे. यातच त्यांच्या कामाची थोरवी आहे. रावसाहेब. रावबहादूर, पद्मभूषण (१९५७), पुणे विद्यापीठाची डी. लिट. अशा अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.

- मृणालिनी चितळे

संदर्भ:

  1. कुलकर्णी, व. दि., संपादन: 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' खंड ६.



सरदेसाई, रघुनाथ गोविंद
कथालेखक, संपादक, लघुनिबंधकार विनोदी लेखक, नाट्य-चित्रसमीक्षक, क्रीडालेखक
७ सप्टेंबर १९०५ - ११ डिसेंबर १९९१

 रघुनाथ सरदेसाईंची खरी ओळख आहे ती क्रीडाविषयक पुस्तकांचे लेखक म्हणूनच त्यांचा जन्म कोल्हापूरचा व शिक्षणही कोल्हापुरातच झाले. १९२५ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यांनी पुण्याच्या 'स्फूर्ती' व 'चित्रमयजगत्' या मासिकाचे संपादक, सहसंपादक म्हणून काही काळ कार्य केले. नंतर मुंबईच्या 'विहार', 'विविधवृत्त', 'नवयुग', 'तारका' इत्यादी साप्ताहिकांत; 'चित्रा', 'मराठा' या दैनिकांत आणि 'यशवंत' या मासिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. १९७० पासून ते 'नवा काळ' मध्ये सहसंपादक होते. या वृत्तपत्रातून त्यांनी क्रीडा व चित्रपट-नाट्यविषयक अभ्यासपूर्ण असे भरपूर लेखन केले.
 'स्वाती' (१९३९), 'चित्रा' (१९४०), 'महाश्वेता नि इतर कथा' (१९४६) हे कथासंग्रह व 'सुरसरी' (१९४१), 'आमचा संसार' (१९४८) हे विनोदी लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी काही रहस्यकथाही लिहिल्या. पण त्यांची वाचकप्रिय गाजलेली पुस्तके आहेत ती क्रीडाविषयावरीलच.
 'हिंदी क्रिकेट' (१९४८) हे त्यांचे पुस्तक, क्रिकेटसंबंधीचे मराठीतील पहिले पुस्तक आहे. तसेच टेनिस या खेळासंबंधी ऐतिहासिक दृष्टिकोनातून माहिती देणारे असे 'खेळांचा राजा लॉन टेनिस' हेपण मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.
 'खेळांच्या जन्मकथा' (१९६६), 'महान क्रिकेट कर्णधार' (१९७०), 'क्रीडाकथा' (१९७२), 'ऑलिम्पिक सामने', 'खेळ किती दाविती गमती' (१९७६) अशी क्रीडाविषयक अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बुद्धिबळ, गोल्फ, मुष्टियुद्ध, ॲथलेटिक्स, पत्ते, क्रीडानौका शर्यती- अशा नानाविध क्रीडाप्रकारांतील गमतीजमती व त्या वेळी घडलेल्या घटनांचे त्यांचे वाचनीय पुस्तक आहे, 'क्रीडाकथा' (माहिती आणि मनोरंजन). विविध क्रीडा प्रकारांतील गमतीजमतींची, त्या खेळांची एकत्र माहिती देणारे हे मराठीतील बहुधा पहिलेच पुस्तक असावे.
 एकूणच क्रीडा- खेळ हा त्यांच्या लेखनाचा, जिव्हाळ्याचा विषय होता. लेखकाला लहानपणापासूनच खेळांची आवड असल्यामुळे आणि त्यातून व्यवसाय वृत्तपत्रकाराचा, त्यामुळे ३०-३५ वर्षे ते सातत्याने क्रीडाविषयक लेखन अत्यंत आवडीने करीत होते.


६२६
शिल्पकार चरित्रकोश