Jump to content

पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ- औ अत्रे, प्रल्हाद केशव (१९६९), 'मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी' (१९७३), 'क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर' (१९८३) 'गडकरी सर्वस्व' (१९८४), 'मी अत्रे बोलतोय' (१९९६) आदी लेखसंग्रह, आणि सुमारे पन्नास पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना असा अत्रे यांचा विपुल साहित्यसंभार आहे. खरीखुरी अतिशयोक्ती आपले लेखन करताना अत्रे यांनी काही वेळा 'मकरंद, 'केशवकुमार', 'आनंदकुमार', 'आत्रेय', 'घारूअण्णा घोडनदीकर', 'सत्यहृदय', 'प्रभाकर', 'साहित्य फौजदार', 'वायुपुत्र', 'काकाकुवा', 'अस्सल धुळेकर', 'निकटवर्ती', 'जमदग्नी', 'महाराष्ट्र सेवक' इत्यादी टोपणनावे उपयोगात आणली आहेत. आधुनिक महाराष्ट्रात इतके विविधांगी कर्तृत्व दाखविणारा दुसरा लेखक सांगणे अतिशय अवघड आहे. ही सर्व कामगिरी लक्षात घेऊनच 'आचार्य अत्रे, एक खरीखुरी अतिशयोक्ती' असे गंगाधर गाडगीळ यांना म्हणावेसे वाटले आहे. विनोदी लेखक आणि वक्ता म्हणून महाराष्ट्रात अत्र्यांना जेवढी लोकप्रियता लाभली, तेवढी दुसऱ्या कोणाच्याही वाट्याला आली नाही. अत्रे यांच्या लेखणीचा प्राणभूत घटक म्हणजे विनोद; तो पंडिती वा कोटिबाज नाही. मानवी वर्तनातील व स्वभावातील विसंगती टिपणारा, काही वेळा बोचकारणारा, बाष्कळ, उच्छृंखल व क्वचित शिवराळ आहे. परंतु त्यातील ताजेपणा व उत्स्फूर्तता मराठीतील दुसऱ्या कुठल्याच विनोदकारामध्ये आढळत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील धाडस व आक्रमकता यांचा त्यांच्या साहित्यातही आविष्कार घडतो आणि तोच त्यांच्या साहित्याला वेगळेपणा बहाल करतो. १९४२ साली नाशिक येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात त्यांनी अनेक विषयांविषयी विचार मांडले त्यांत त्यांना विनोदाविषयीही आपले मतप्रतिपादन केले आहे. ते म्हणतात, "मानवी जीवनात रोग, जरा, मरण, अपघात, हानी, पराभव, निराशा, अपमान, अज्ञान, मूर्खपणा अशी अनंत दुःखे भरलेली आहेत. ह्या दुःखांकडे गांभीर्याने २ साहित्य खंड पाहिल्यास ती दुणावल्याखेरीज राहणार नाहीत. म्हणून त्यांच्याकडे खेळकर दृष्टीने बघून जीवन सुखावह करण्यासाठी मनुष्याला विनोदाची देणगी मिळालेली आहे. विविध प्रकारचे दुःख हा विनोदाचा एकमेव विषय आहे. समाजातील अनिष्ट रूढी आणि सवयी नाहीशा करावयाच्या असतील, तर त्यांच्यामधील अनिष्टपणा आणि निरर्थकता हे विनोदाच्या साहाय्याने समाजापुढे उघडे करून दाखविले पाहिजे." त्यांची हीच विनोदविषयक दृष्टी त्यांच्या साहित्यनिर्मितीतूनही प्रकटली आहे.

'झेंडूची फुले' हा अत्रे यांचा अजरामर ठरलेला विडंबन कवितासंग्रह म्हणजे रविकिरण मंडळाची कवितेच्या अंगाने काव्यभाषेत केलेली समीक्षा आहे. 'मी कसा झालो' हे अत्रे यांचे आत्मचरित्रात्मक लेखन १९५३ पर्यंतच्या काळातील अत्र्यांच्या जीवनाचे प्रत्ययकारी व नाट्यपूर्ण असे दर्शन घडविते. 'कऱ्हेचे पाणी' या आत्मचरित्रात्मक खंडांतून त्यांनी महाराष्ट्राचा ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक व वाङ्मयीन स्वरूपाचा धावता आलेख रेखाटला आहे. सामान्य माणूस मोठी कामगिरी कशी करू शकतो, हे वाचकांच्या मनावर ठसविण्यासाठी त्यांनी हे लेखन केले आहे. त्यांच्या ठायी असणारे सामर्थ्य आणि काय हवे, काय नको; ते रोखठोकपणे सांगणारी पारदर्शी शैली प्रकटते. 'फुलांची ओंजळ', 'बहिणाबाई चौधरी यांच्या कविता', दि. वि. देव संपादित 'उपहासिनी' या काव्यसंग्रहाची प्रस्तावना, 'संपूर्ण गडकरी' व 'अप्रकाशित गडकरी' या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना या दृष्टीने विशेष उल्लेखनीय ठरतात., 'गुत्त्यात नारद', 'बँडीची बाटली', 'बाजारात तुरी', 'सार्वजनिक जीवन', 'पहिले कावळे संमेलन', 'गांधीवादी पाहुणे' यांसारख्या त्यांच्या विनोदी कथा, कथेचा प्रकृतिधर्म सांभाळणाऱ्या आहेत. वेधक आरंभ, कृतिप्रधान प्रसंग, पृथगात्म पात्रनिर्मिती, चित्रदर्शी मांडणी, प्रसंगनिष्ठ व शब्दनिष्ठ विनोदातील सहजता व कलाटणीपूर्ण अंत अशा स्वरूपात अत्रे यांच्या कथा साकार होतात. अत्रे यांनी केलेले व्यक्तिगौरवप्रधान लेखन मराठी साहित्येतिहासात अपवादाभूत म्हणावे लागेल. साने शिल्पकार चरित्रकोश