Jump to content

पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
साहित्य खंड
अत्रे, प्रल्हाद केशव
 
अ ते औ

अत्रे, प्रल्हाद केशव
कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपटकथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ
१३ ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९
मुख्य नोंद - पत्रकारिता आणि ललितेतर साहित्य खंड

 आपल्या सहज विनोदनिर्मितीने मराठीत सर्वांत लोकप्रिय विनोदकार प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडच्या कोटीन या गावी झाला.
 १९११ मध्ये अत्रे पुण्याला आले व त्यांचे पुढील शिक्षण पुण्याच्या भावे स्कूलमध्ये झाले. पुण्यातील तत्कालीन वाङ्मय जगताने अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळेच वळण दिले. १९१२ साली राम गणेश गडकरी यांच्याशी अत्र्यांची भेट झाली. या भेटीचा व त्यानंतर गडकऱ्यांशी आलेल्या संबंधाचा अत्रे यांच्या साहित्यावर बराच प्रभाव पडला. गडकऱ्यांप्रमाणेच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, नारायण वामन टिळक, बालकवी ठोमरे, इत्यादिकांशी त्यांचा परिचय झाला. केशवसुत, गोविंदाग्रज व बालकवी यांच्या कवितेने ते झपाटले गेले. त्यामुळेच त्यांच्या हातून काव्यरचना घडली.
 आपल्या असामान्य लेखनकर्तृत्वाने अत्रे यांनी नाटक, काव्य, पाठ्यपुस्तक निर्मिती, व्यक्तिप्रधान लेखन, विनोदी लेखन, विनोदी कथा, चित्रपट कथा अशा साहित्याच्या क्षेत्रांत अस्सल मराठी वळणाचे सुंदर, प्रासादिक व खुमासदार लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून तर मान्यता मिळवलीच शिवाय आपल्या निर्मितीने नाटकांत व विनोदांत अपूर्व असे मानदंड निर्माण केले.
 त्यांच्या एकंदर साहित्यनिर्मितीची केवळ नोंदही प्रचंड ठरेल. 'अकरावा अवतार' (१९२०), 'झेंडूची फुले' (१९२५), 'गीतगंगा' (१९३५), 'पंचगव्य' (दत्तू बांदेकरांच्या सहकार्याने १९५८) हे कवितासंग्रह; 'संगीत गुरुदक्षिणा' (१९३०), 'संगीत वीरवचन' (१९३२), 'साष्टांग नमस्कार' (१९३३), 'घराबाहेर' (१९३३), 'भ्रमाचा भोपळा' (१९३५), 'उद्याचा संसार' (१९३६), 'लग्नाची बेडी' (१९३६), 'वंदे मातरम्' (१९३७), 'पराचा कावळा' (१९३८), 'मी उभा आहे' (१९३९), 'जग काय म्हणेल?' (१९४६), 'पाणिग्रहण' (१९४६), 'कवडीचुंबक' (१९५१), 'एकच प्याला' (गडकऱ्यांच्या 'एकच प्याला' या नाटकाचे विडंबन, १९५३), 'वसंतसेना' (१९५८), 'मोरूची मावशी' (१९६३), 'बुवा तेथे बाया' (१९६४), 'तो मी नव्हेच' (१९६५), 'मी मंत्री झालो' (१९६६), 'डॉक्टर लागू' (१९६७), 'प्रीतिसंगम' (१९६८), 'ब्रह्मचारी' (१९६९), 'अशी बायको हवी' (१९६९), 'सम्राट सिंह' (शेक्सपिअरच्या 'किंग लिअर'चा अनुवाद, १९७३), 'साखरपुडा' (१९४२), 'ब्रँडीची बाटली' (१९४४), 'वामकुक्षी' (१९४९), 'बत्ताशी आणि इतर कथा (१९५४), 'हास्यकथा' (भाग १, १९५८), 'हास्यकथा' (भाग २, १९५९) हे कथा संग्रह; 'महाराष्ट्र मोहरा' (१९१४), 'मोहित्यांचा शाप' (१९२१), 'चांगुणा' (१९५४) या कादंबऱ्या; 'मी कसा झालो?' (१९५३), 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मवृत्तात्मक लेखन; 'चित्रकथा' (भाग ११: १९५९) हा चित्रपट कथासंग्रह; 'अत्रे उवाच' (१९३७-१९४२), 'स्वराज्याचा अरुणोदय' (१९४६), 'पत्रकार अत्रे' (१९५३), 'सूर्यास्त' (१९६४), 'सुभाषकथा' (१९६४), 'इतका लहान - इतका महान' (१९६६), 'समाधीवरील अश्रू'

शिल्पकार चरित्रकोश