पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८०)

जावें. ही स्थिति येण्यास शिक्षक थोडा कुशल पाहिजे. सामान्यभावस्पष्टीकरणार्थ जी उदाहरणे घ्यावयाची त्यांची योग्य निवडानिवड करण्यांत थोडी खुबी लागते व शिक्षकास माहितीहि बरीच असावी लागते.उदाहरणार्थ,- वनस्पतिशास्त्रांत झाडांचे वर्ग केलेले असतात;यांपैकी एखाद्या वर्गाचें सामान्यस्वरूप काय आह हें जर मुलांना समजून सांगावयाचे असेल तर आपणांस त्या वर्गापैकी असेंच एखादें झाड काढिले पाहिजे की, त्याच्या निरीक्षणाने सर्व काही स्पष्ट झाले पाहिजे. प्रधान गुणधर्म कोणते व गौण कोणते हेहि शिक्षकाने मुलांस सांगितले पाहिजे. उदाहरणार्थ,फुलांचे ठिकाणी तांबडेपणा हा गौण धर्म होय. तसेंच धातूंचे ठिकाणी असलेला घनपणा हाहि गौणधर्मच होय. कारण पारा पातळ अगर द्रवरूप स्थितीत असतो. परंतु ही सर्व माहिती जर शिक्षकास असेल तरच ती तो मुलांस सांगणार. स्पष्टीकरणार्थ जी उदाहरणे घ्यावयाची ती पुरे इतकी असावीत. त्याचप्रमाणे ती फारहि असतां कामा नयेत; कारण मुले गोंधळतात. प्रोफेसर बेनचे असें मत आहे की, कोणत्याहि वस्तूच्या प्रधान गुणधर्माच्या स्पष्टीकरणार्थ फार झाले तर दोनतीन उदाहरणे घ्यावीं; जास्त घेऊ नयेत. वस्तूंची तुलना करून झाली व सामान्य गुणधर्माचे वर्गीकरण झाले म्हणजे मग त्या वर्गाचे अगर जातीचे दर्शक असे शब्द सांगावे व नंतर व्याख्या सांगावी. व्याख्या प्रथमारंभी कधीच सांगू नये. भूमिति, भूगोल व व्याकरण हे विषय शिकवितांना शिक्षकानें नेहमी ही गोष्ट ध्यानात बाळगावी की, आपलेपेक्षां वडील माणसांचे तोंडांतून जे शब्द निघतात ते ऐकून मुलें त्यांचा भाषेत उपयोग करूं लागतात; कारण त्या वेळेस शब्दांचा बरोबर अर्थबोध त्यांस होत असतो अशांतली स्थिति नसते. यास्तव शिक्षकाने मुलांना शब्दांचा अर्थबोध झाला आहे की नाही ते नेहमी पाहावें, व शक्य त्या ठिकाणी तो तसा होण्याकरितां होईल तितका यत्न करावा. तात्पर्य, मुलांच्या मनांत संदिग्ध व संशयात्मक कल्पना राहूं देऊ नयेत. असे जर केले तरच उच्च मनोव्यापार व्हावे तसे होतील.