पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५४)

अर्थ समजत नसून जे श्लोक केवळ एकाच अर्थाच्या शब्दांच्या सांखळ्या असतात, ते चारदोन वेळां वाचले की मुलांच्या ध्यानात राहतात. असो; येथवर स्मरणशक्तीची वाढ कसकशी होत जाते तें सांगितले. आतां शिक्षकास या शक्तीस योग्य वळण कसे लावितां येईल ते पाहूं.
 स्मरणशक्तीचा विकास व तत्संबंधी शिक्षकाने करा-वयाच्या गोष्टीः - वर स्मरणशक्तीच्या स्वरूपाचे वर्णन दिलेच आहे. त्यावरून आपल्या असे ध्यानात आले असेल की, अगोदर ग्रहण व नंतर स्मरण असा क्रम आहे. आपण एखाद्या गोष्टीचे जर ग्रहणच केले नाही तर तिचे स्मरण तरी होणार कसे ? यावरून स्मरणशक्तीच्या शिक्षणक्रमाचे मुख्य दोन भाग करितां येतील (१)ग्रहण व (२) स्मरण.
 (१) ग्रहणः- शिक्षक जे सांगतात तें मुलांच्या मनांत ठसलें पाहिजे, तरच त्याची पुढे काही कालानें स्मृति होणार. मुलांचा मेंदू ज्या वेळी तरतरीत असेल, ज्या वेळी त्यांना कोणतीहि शारीरिक अगर मानसिक व्याधि नसेल, तेव्हांच त्यांना आपण जे सांगू तें ग्रहण करितां येईल, ही गोष्ट शिक्षकांनी ध्यानात ठेविली पाहिजे. सकाळी व निजण्यापूर्वी तास अर्धातास आपला मेंदू तरतरीत असतो असे शास्त्रज्ञांनी सप्रमाण ठरविले आहे. कोणताहि विषय शिकविताना तो जितका सुलभ व चित्ताकर्षक करितां येईल तितका करावा. मुलांच्या मनावर आपण काहीतरी ओझें लादीत आहों असें मुलांस वाटतां कामा नये. विषय मुलांच्या सामर्थ्यानुरूप असावा. विषयाची मांडणीच अशी पाहिजे की, मुले त्या विषयाकडे सहज आनंदाने लक्ष देतील. मुलांचा स्वाभाविक कल कोणीकडे आहे या गोष्टीचाहि शिक्षकानें जेथे शक्य तेथें थोडाबहुत विचार केला पाहिजे. मुलांच्या ठिकाणी ज्ञानामृतपानलालसेचा अभाव असतो. सबब विषय सुलभ व चित्ताकर्षक केलाच पाहिजे. असे केल्याने मुलांस त्या विषयांत गोडी लागू लागते; व मग साहजिकच मुलें तो विषय नीट ग्रहण करितात. पुनरावृत्तीचे तत्त्वाचाहि आपण