पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
साहित्य : माणूस घडणीचं विधायक साधन

 ‘शब्द सोन्याचा पिंपळ' हा माझा साहित्यविषयक लेखसंग्रह होय. तो सन २०१३ मध्ये रावा प्रकाशनाने प्रकाशित केला होता. लगेच दुस-या वर्षी त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशन राहुल कुलकर्णी यांनी काढली होती. तेव्हा या संग्रहात सन १९८५ ते २०११ पर्यंतचे २५ लेख समाविष्ट होते. आज २०१७ मध्ये हे पुस्तक त्यात लेखांची भर घालून विकसित करण्यात आले आहे. ते सन २०११ नंतर लिहिलेले आहे. ही सुधारित आवृत्ती ‘अक्षर दालन'चे अमेय जोशी प्रकाशात आणत आहेत. या दोन्ही प्रकाशकांचे आभार.
 या साच्या लेखनाचा आवाका हा समग्र साहित्यव्यवहार होय. साहित्याच्या अगोदर भाषा निर्माण झाली. भाषेचा प्रारंभ वर्णापासून मानला जातो. वर्ण दोन प्रकारचे असतात - स्वर आणि व्यंजन. स्वर अगोदर निर्माण झाले. त्याचं कारणही सरळ आहे. प्रारंभी माणसाकडे भाषा नव्हती. तो सारा व्यवहार हावभावांनी करायचा. त्याला सूक्ष्म जोड देण्यासाठी तो स्वर वापरू लागला. माणसाचा जीवन व्यवहार व व्यापार वाढला तेव्हा स्वरांपलीकडे जाऊन काही व्यक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्या आवश्यकतेतून वस्तूचे आकार, रंग, ध्वनी, स्वरूप यातून प्रतीक निर्माण झाली, ती मनुष्य गुंफेत राहात असतानाच्या काळात पुढे चित्ररूप घेती झाली. भाषा लेखनाची आद्य रूपं म्हणजे गुंफांतील चित्र वा कोरीव लेख, चित्रलिपी असा जो शब्द आहे, त्यातच आपल्या लेखनाचं बीज आहे. स्वर आणि व्यंजनांच्या एकीकरणातून अक्षरं, शब्द बनले. शब्दसमूहांचं वाक्य बनलं. वाक्यांचे परिच्छेद झाले. परिच्छेद समूहातून खंड, अध्याय, प्रकरणांची निर्मिती झाली. त्यांच्या संग्रहांच्या पोथ्या, पुस्तकं, ग्रंथ झाले.