पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा आपल्या लेखनाचा रंजक विकास, इतिहास आणि प्रवास आहे.
 भाषेचे मूलभूत अंग म्हणून बनलेले स्वर, व्यंजन वा वर्ण निरर्थक नाहीत. आपल्या प्रत्येक स्वर व व्यंजनांची निर्मिती व्यावहारिक आवश्यकतेतून झाली असल्याने प्रत्येक वर्गाला अर्थ आहे. ‘ख’ म्हणजे आकाश. भूगोलात ‘ख’ स्वस्तिक असतो. 'ग' म्हणजे गमन करणे. यांच्या संयोगाने बनलेला शब्द ख + ग = खग. त्याचा अर्थ पक्षी. आकाशात विहरणारा तो पक्षी. असा सर्व शब्द, अक्षरांचा शोध व्युत्पत्तीशास्त्रात घेतला जातो. तसंच लेखनाचंही. पूर्वीचं ‘अ’ अक्षर संक्षिप्त होत होत त्याचं आजचं रूप तयार झालं आहे. लिपीशास्त्रात ‘अ’ स्वर पूर्वी कसा लिहिला जायचा, मध्य काळात कसा लिहीत व आजचं रूप कसं झालं याची साद्यंत माहिती वाचावयास मिळते. म्हणून साहित्य, भाषा, शैली, व्याकरण, छंद, अलंकार, विरामचिन्हे, ताल, संगीत सारं मिळून आपलं जीवन बनतं. म्हणून साहित्य समग्र असतं.
 या पुस्तकात शब्द, वाचन, पुस्तक, साहित्य, समीक्षा, लेखक, ग्रंथालय, विचार अशा अंगांचे वैविध्यपूर्ण लेख आहेत. काही ललित लेखही आहेत. उदाहरणार्थ ‘झंप्री' ते काही मनात योजून लिहिले गेले नाहीत. निमित्तानं केलं गेलेलं हे लेखन आहे. पण आज एकत्रपणे पाहताना माझ्या लक्षात आलं आहे की, अजाणतेपणी या सर्वांतून साहित्याचा एक समग्र धांडोळा घेतला गेला आहे. शब्द किती व्यापक ते धन आहे, शस्त्र आहे, शक्ती आहे, विचार आहे, अर्थ आहे... काय नाही शब्दात? म्हणून तर तो जपून वापरायचा. शब्दांचं वजन, अर्थछटा, उच्चार, लय, लकब या सा-यांचं भान ज्या साहित्यिकास असतं तो लेखक, कवी म्हणजे शब्दांचा किमयागार! अल्प शब्दांत महान नि गहन अर्थ, आशय, व्यक्त-अव्यक्त सारं प्रतिबिंबित करायची किमया कवीत असते. आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, विंदा, कुसुमाग्रज या सा-यांची बलस्थानं, ओळख वेगळी का? तर त्यांनी शब्दांचे वेगवेगळे खेळ मांडले. या पुस्तकात ‘अजून मोहविते मधुशाला' शीर्षक लेख आहे. 'मधुशाला' हे हिंदीतलं प्रेमकाव्य, हरिवंशराय बच्चन यांनी ते लिहिलं. सन १९८५ ला या काव्याला पन्नास वर्ष झाली. त्याचं सौंदर्य मराठी वाचकांना कळावं म्हणून लिहिलेला हा लेख. बच्चन पूर्वी ‘मधुशाला' गाऊन सादर करायचे. सुरेभ भटांनी पण एकेकाळी आपल्या गझल अशा गाऊन सादर केल्या आहेत. बच्चन यांच्या सादरीकरणाने हिंदी वाचक, श्रोत्यांचा, कवितेवर प्रेम करणा-यांचा एक नवा वर्ग हिंदी साहित्यात तयार