१ लें.] नीतीचे स्वरूप व तिचे प्रकार. १३ असा प्रकार राजनीतीचा नाही. तिची दृष्टि जरी पारलौकिक सुखावरच असते, तरी ती वाटेत कांहीं अडचणी आल्या असतां, युक्तिपयुक्तीने त्या टाळून व वारा वाहील तशी पाठ फिरवून इच्छित स्थळी जाण्यास बघत असते. अशा रीतीने संकटें टाळण्याकरितां ती जेव्हां आडवळणे घेते, तेव्हां अदूरदृष्टीचे लोक ती आडरानांत बहकली, व तिचा खरा मार्ग सुटला अशी उगांच कावकाव करितात, परंतु वास्तविक गोष्ट तशी नसते. सामान्य नीतीस संकटे सोसण्याची ताकद असते, व राजनीतीस संकटे टाळण्याची, किंवा त्यांतून युक्तीने निभावून जाण्याची, नजर व हिकमत असते; अशा प्रकारे दोघीही आपआपल्या अंगच्या निरनिराळ्या गुणांनी परलोकमाप्ति करून घेतात; यास्तव जे सडे फाटिंग असतील, व ज्यांस सहनशक्ति विशेष असेल, त्यांनी इच्छा असल्यास सामान्य किंवा सरळनीतीची सोभत धरणे कदाचित् चांगले होईल, परंतु ज्यांच्या पाठीमागे संसाराचे लटांबर आहे व ज्यांस तितकी सहनशक्ति नाहीं, त्यांनी राजनीतीचाच आश्रय केला पाहिजे. अशा लोकांचा सरळनीतीच्या कांसेस लागून निभाव लागत नसतो. यास्तव संसारी जनास, अर्थात बहुजनसमाजास, उपयुक्त जी राजनीति, तिचे प्रस्तुत स्थळीं सामान्यतः वर्णन करूं.
पान:व्यवहारपद्धति.pdf/26
Appearance