पान:व्यवस्थापनाची मूलतत्त्वे (Vyavasthapanachi Multatve).pdf/१८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
व्यवस्थापन नेतृत्वाची गुणवैशिष्टये
२१३
 

असतात आणि तो त्याची कारकीर्द, भविष्यातील संधी, सगळ्या गोष्टींचा त्याच्या तत्त्वांसाठी त्याग करायला तयार असतो. यामुळे त्याच्या अनुयायांच्या मनात भक्तिभाव निर्माण होतो आणि त्या धीरपुरुषाला करिष्मा प्राप्त होतो.


प्रिन्स

तिस-या प्रकारच्या करिष्मा म्हणजे ‘प्रिन्स' करिष्मा. हे नाव मॅकॅव्हलीच्या 'द प्रिन्स' या पुस्तकावरून आले आहे. मॅकॅव्हली हा एक मध्ययुगीन तत्त्वज्ञ होता. त्याने राजेमहाराजांना सत्ता कशी मिळवावी आणि ‘सत्ताधिकार' कसा टिकवून ठेवावा याचा सल्ला देण्यासाठी एक पुस्तक लिहिले. त्याने सुचविलेले उपाय हे अनैतिक नसले तरी सदाचाराला धरून निश्चितच नाहीत. सत्ताधिकारासाठी सत्ताधिकार मिळविणे इष्ट आहे. त्याने दिलेला खूपसा सल्ला हा विविध राजकीय आणि व्यवस्थापकीय परिस्थितीमध्ये उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, तुम्ही कधीही तुमच्या नंतरची म्हणजे 'नंबर दोन'ची व्यक्ती ठेवता कामा नये; कारण नेहमी ही नंबर दोनची व्यक्तीच नंबर एकच्या व्यक्तीला गडगडविते! हाताखालच्या इतर व्यक्तींसाठी संगीत-खुर्चीचा खेळ ठेवावा म्हणजे ते एकत्र येऊन उच्चस्थानावरील व्यक्तीला खाली गडगडवून पाडणार नाहीत. या प्रकारचा सल्ला भयावर आधारित करिष्मा निर्माण करण्यासाठी सहायक ठरतो. लोक प्रिन्सला भिऊन असतात; कारण प्रिन्सला साधारणपणे काही नीतिनियम नसतात. नीतिशून्य असल्याने तो काहीही करू शकतो आणि यामुळे लोक भितात. प्रत्येकाचे स्वत:चे असे एक चिमुकले विश्व असते. त्याचे भवितव्य, त्याचे कुटुंब, त्याची मुलेबाळे. त्याचे हे चिमुकले विश्व त्याला कोणत्याही हल्ल्यापासून सुरक्षित ठेवायचे असते आणि म्हणून प्रिन्सचा करिष्मा स्वीकारायला तो तयार असतो.

 जे लोक स्वतः प्रिन्स असतात ते एकमेकांशी हातमिळवणी करायला तयार असतात. जशास तसे आणि देवाणघेवाण या आधारावर त्याच्याशी व्यवहार करणे अत्यंत सोपे असते - यात तुला काय आहे आणि मला काय आहे!


व्यवस्थापकीय नेते

व्यवस्थापकीय परिस्थितीमध्ये आपण तीनही प्रकारच्या करिष्म्याची उदाहरणे पाहू शकतो. पहिल्या पिढीतील यशस्वी उद्योजक हा निसर्गत: महामानव असतो. जे १०० लघुउद्योग सुरू होतात त्यातील ९० उद्योग पहिल्या तीन वर्षांत कोसळतात. उरलेल्या पापकी ९ उद्योग कसेबसे फार मोठे यश न मिळविता पाय ओढत वाटचाल करीत