घेतलेले असते. पण श्रेष्ठ व्यक्ती स्वत:च्या नीतिशास्त्राचे नियम घडवितात - जे समाजाच्या नीतिनियमांहून वेगळे वा भिन्न असण्याची शक्यता असते. गांधीजींचे उदाहरण घ्या. इतर प्रत्येक बाबतीत गांधीजी हे हिंदू सनातनवादी विचारांचे होते; पण हरिजनांच्या बाबतीत मात्र ते नेमके विरुद्ध होते. या प्रकारे एखादी व्यक्ती स्वत:च्या मनाला पटलेल्या बाबींचे स्वत:चे नीतिनियम तयार करते आणि हाताखालील मंडळींना त्याचे हे नीतिनियम त्यांच्या नीतिनियमांपेक्षा कसे श्रेष्ठ आहेत हे पटवून देते.
गांधीजींची शिष्या असलेल्या एका वयोवृद्ध स्त्रीची मला आठवण होते. एकदा तिने गांधीजींना त्यांच्या वाढदिवशी विचारलं, “बापूजी, मला तुम्हांला एक भेट द्यायचीय. मी काय भेट द्यावी तुम्हांला?" ती बाई सनातनी विचारांची आहे हे गांधीजी जाणून होते. ती, तिची सून; किंवा ब्राह्मण यांव्यतिरिक्त अन्य कुणालाही तिच्या स्वयंपाकघरात जायची अनुमती नव्हती. गांधीजी म्हणाले, “खरंच का तुला मला भेट द्यायचीय? तर मग एक हरिजन स्वयंपाकी कामाला ठेव!"
ती म्हणाली, “बापूजी, आमच्या घरात आम्ही हरिजन स्वयंपाकी कसा काय ठेवणार? आमचं सोवळेओवळं इतकं कडक असतं की अगदी आमची पुरुषमंडळीही स्वयंपाकघरात पाऊल ठेवू शकत नाहीत."
गांधीजींनी उत्तर दिले, “मला तू फक्त एवढंच करायला हवंय. जर तुला हे करायचे नसेल, तर कृपया एक काम कर. तुला माझ्यासाठी काय करायचंय हे पुन्हा मला विचारू नकोस."
ती बाई तीन दिवस झोपू शकली नाही. चौथ्या दिवशी ती हरिजन स्वयंपाकी शोधण्यासाठी गेली. प्रत्येकाने तिला विचारलं, “तू हरिजन स्वयंपाकी कसा काय कामावर ठेवू शकतेस? तू तर सनातनवादी आहेस."
ती म्हणाली, “हे पाहा, मला अजूनही हे करायला आवडणार नाही. पण जर बापुजी हे सांगत असतील तर त्यात काहीतरी मला न समजणारे तथ्य असणारच."
महामानवाचा करिष्मा असतो तो हा असा.
करिष्म्याचा दुसरा प्रकार म्हणजे धीरपुरुषाचा करिष्मा. धीरपुरुषाचे नीतिनियम समाजाच्या नीतिनियमांसारखेच असतात, पण त्याच्या नीतिनियमांसाठी तो त्याग करायला तयार असतो. प्रत्येकाचे नीतिनियम असतात. पण जेव्हा स्वहित नीतिनियम यांच्यात संघर्ष उभा राहतो तेव्हा साधारणपणे नीतिनियम पायदळी तुडविले जातात. पण धीरपुरुषाच्या बाबतीत त्याचे नीतिनियम इतर सगळ्या गोष्टीपेक्षा श्रेष्ठ