निर्णय घेणे हे व्यवस्थापकाचे एक महत्त्वाचे काम आहे. मात्र, सगळे निर्णय व्यवस्थापक मंडळीच घेतात असे नाही.
मला आठवतंय, एका प्रसंगी मी जेव्हा असं म्हणालो की व्यवस्थापक सर्व निर्णय घेतात, तेव्हा एक कारकून उठून म्हणाला, “आमचा व्यवस्थापन संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) महिन्याभरात जेवढे निर्णय घेतो त्याहून जास्त निर्णय मी रोज घेतो."
“कोणते निर्णय घेता तुम्ही?" मी विचारलं.
“ टपालाचं काम पाहणारा कारकून आहे. प्रत्येक लिफाफ्यावर किती पोस्टेज लावायचं, चेक साध्या टपालाने पाठवायचा की रजिस्टर्ड पोस्टाने, एखादे पाकीट बुकपोस्टने धाडायचं की पार्सलने याविषयीचे निर्णय मी घेतो."
हे नक्कीच निर्णय आहेत, पण हे निर्णय निर्धारित पर्यायांच्या निवडीवर आधारित आहेत. पण व्यवस्थापक जे निर्णय घेतात त्याचा पर्यायाने संघटनेच्या हितावर परिणाम होतो. आपण अशा निर्णयांविषयी बोलणार आहोत; कारण त्यासाठी निर्णयशक्ती लागते.
व्यवस्थापकीय मंडळी निर्णय कसे घेतात याकडे आपण ज्यावेळी पाहतो तेव्हा त्यात दोन बाबी असतात. एक म्हणजे माहिती आणि दुसरी बाब म्हणजे निर्णयशक्ती. निर्णय घेण्यासाठी प्रत्येक व्यवस्थापक त्याला जितकी मिळू शकेल तितकी माहिती जमवितो. तर्कबुद्धी वापरून तो या माहितीचे विश्लेषण करतो. पण त्याला काही प्रमाणात निर्णयशक्तीचा वापर करावाच लागतो. आपण या निर्णयांचे विश्लेषण करू या.
आपण त्या टपाल-कारकुनाच्या उदाहरणापासून सुरुवात करूया. टपाल-कारकुनाला