पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७४
वैयक्तिक व सामाजिक

इतके बल त्याला प्राप्त झाले. भारतात हे झाले नाही. येथे ग्रंथकार झाले नाहीत असे नाही. पण श्राद्ध, पक्ष, प्रायश्चित्ते, शेंडी, हजामत, ग्रहणांची फले त्यांचे हे विषय होते. निवृत्ती, संसाराची असारता, भेसुरता, मोक्ष हे त्यांचे विषय होते. समाज, राष्ट्र, संघटना, स्वराज्य, साम्राज्य यांसाठी अवश्य तो धर्म, ते तत्त्वज्ञान हा कोणाचाच विषय नव्हता. इतक्या दीर्ख कालखंडात असा धर्मप्रवक्ता, असा स्मृतिकार भारतात होऊ नये, हे मोठे आश्चर्य आहे. पण भारतात शंकराचार्यांपासून पुढे शतकानुशतक दृढमूल होत गेलेला निवृत्तिवाद हेच याचे प्रधान कारण होय. त्याचा विचार मागे केलाच आहे. आता निवृत्तिवादातून 'अदृष्टफल-प्रधान' असा जो अत्यंत घातकी धर्म पोसला जातो त्याचे रूप पाहावयाचे आहे.
 आपण जी धर्मतत्त्वे स्वीकारतो ती योग्य की अयोग्य हे प्रत्यक्षात त्याची फळे काय मिळतात, ते पाहून ठरविले पाहिजे, असा एक पक्ष आहे. दुसऱ्या पक्षाला हे मान्य नाही. त्याच्या मते धर्माची फळे स्वर्गात, परलोकात मिळावयाची असतात. ती अदृष्ट असतात. तेव्हा फलप्राप्ती पाहून धर्मतत्त्वांची पारख करणे हे योग्य नाही. तसा मनुष्याला अधिकारच नाही. त्याने श्रुति- स्मृतीत सांगितलेले धर्माचरण करीत राहावे. फळ पाहून, श्रुतिस्मृतिप्रणीत धर्माचे यशापयश मोजणे हे सर्वथा गर्ह्य होय. या दुसऱ्या म्हणजे अदृष्टफलधर्माचा स्वीकार समाजाने केला की त्याचा नाश ठरलेलाच आहे. नवव्या- दहाव्या शतकात भारतातल्या शास्त्री-पंडितांनी, ब्राह्मण-क्षत्रियांनी आणि एकंदर समाजाने या अनर्थकारी धर्माचा स्वीकार केला हे इतिहासावरून स्पष्ट दिसते. परदेशगमनाचीच गोष्ट पहा. कलिवर्ज्य प्रकरणात द्विजांना समुद्रगमनाला बंदी केलेली आहे. पूर्वीच्या काळात १०।१२ शतके भारतीय लोक व्यापारासाठी व दिग्विजयासाठी विश्वसंचार करीत आणि त्यात भूषण मानीत. असे असताना कोणातरी शास्त्रीपंडितांच्या कुजलेल्या मेंदूत समुद्रयानाला हिंदूंना बंदी करावी असा विचार आला. यामुळे व्यापार बुडाला, विजिगीषा नष्ट झाली आणि हिंदू लोक घोर अंधारात पडले. पण ही सर्व फले होत. ती पाहून म्हणजे प्रत्यक्ष समाजाचा हानिलाभ पाहून धर्मनियम ठरविण्याची प्रथा असती तर पुढल्या कोणातरी धर्मशास्त्रज्ञाने या सिंधुबंदीचा निषेध केला असता. पण या काळात अदृष्टफल-धर्मावर भारतीयांनी श्रद्धा ठेविली