पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५
श्रीशिवछत्रपतींचे क्रांतिकार्य

म्हणून त्यांचा नाश झाला. आक्रमक जो मुसलमान तो सर्व जग हिंडलेला, अनेक देश पाहिलेला आणि म्हणूनच चतुरस्र व हुषार असा होता. अकबर- जहांगीर यांच्या दरबारी रोमहून, बगदादहून, तुर्कस्थानातून लोक येत. त्यांपैकी कित्येक येथेच राहत आणि आपल्या जगाच्या अवलोकनाचा फायदा मुसलमानांना देत. आणि हिंदूंना तर एका नियमाअन्वये, अंग, वंग (बंगाल) कलिंग (आंध्र), सौराष्ट्र, मगध या प्रांतात सुद्धा जाण्यास बंदी होती. समुद्रपर्यटनास तर होतीच होती. समाजाचा जेवढा नाश करता येईल, त्याला जेवढा नेभळा, बावळा, निःसत्त्व बनविता येईल तेवढा बनवावयाचा अशी प्रतिज्ञा करूनच त्या वेळचे शास्त्री-पंडित धर्मशास्त्र सांगत होते, असे दिसते. राजाने लढाई केलीच पाहिजे आणि ब्राह्मणाने प्रवास केलाच पाहिजे असा महाभारतात कटाक्ष दिसतो. त्यांनी हे कर्तव्य न केले तर त्या दोघांना गळ्यात मोठा धोंडा बांधून पाण्यात बुडवावे असे महाभारतकार सांगतात. (द्वावभसि निवेष्टव्यौ गले वध्वा दृढां शिलाम् । राजानं च अयोद्धारं ब्राह्मणं च अप्रवासिनम् ।) ही दृष्टि कोठे आणि आत्मघातकी सिंधुबंदी घालणाऱ्या, अदृष्ट-फलवादी शास्त्रीपंडितांची दृष्टि कोठे ? (तर्कतीर्थ कोकजे यांनी अदृष्ट-फल-धर्माचे विवेचन आपल्या 'धर्मस्वरूपनिर्णय' या ग्रंथात विस्ताराने केले आहे.)
 श्रीधरशास्त्री पाठक, पंडित सातवळेकर, चिंतामणराव वैद्य यांच्या मते हिंदुसमाजाला घातक असे अनेकविध धर्मनियम नवव्या-दहाव्या शतकातच जारी करण्यात आले. जातीजातीत पूर्वी अनुलोम तरी विवाह होत. शूद्राच्या हातचा स्वैपाक खाण्यास व त्याच्या पंक्तीस बसण्यास ब्राह्मणांना बंदी नसे. बालविवाह, विधवाविवाह-निषेध या घातकी रूढी पूर्वी नव्हत्या. जातीजातींची खाण्यापिण्याची, सोवळ्या ओवळ्याची बंधने याच सुमाराला कडक करण्यात आली. त्यामुळे समाज अत्यंत छिन्नभिन्न झाला. वर्ण व जाति एकमेकांपासून पूर्वीपेक्षा जास्त दुरावल्या आणि नित्य उपेक्षा होत राहिल्याने बहुसंख्य समाज व स्त्रिया समाजउत्कर्षाविषयी हळू हळू उदासीन होऊ लागल्या. राजकारण, देशातले राष्ट्रीय व्यवहार यांविषयी कमालीचे औदासीन्य हा त्या काळच्या हिंदुसमाजातला अत्यंत घातक असा दोष होय. निवृत्तिधर्माने तो प्रथम निर्माण झाला, कलियुग- कल्पनेने तो पोसला गेला आणि कडक जातिबंधनामुळे- रोटीबंदी, बेटीबंदीमुळे- सर्व समाजात तो रोगबीजासारखा पसरला.