पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२
वैयक्तिक व सामाजिक

क्रांतीचा अर्थ समजला नाही, हे केवढे दुर्दैव होय ! छत्रपतींनी घडविली ती राज्यक्रांती होतीच. पण त्याच्या आधी ती धर्मक्रांती होती. वर सांगितलेल्या धर्मकल्पना केल्यावाचून राज्यक्रांती होणेच शक्य नव्हते. त्या घातकी कल्पना नष्ट करण्याचे मनःसामर्थ्य साडेसहाशे वर्षांच्या काळात कोणाहि धर्मवेत्त्याच्या ठायी- ब्राह्मणाच्या वा क्षत्रियाच्या ठायी- निर्माण झाले नाही. यामुळेच हिंदुसमाज कमालीचा दुबळा, नेभळा, दरिद्री व निःसत्त्व होऊन गेला. पण मला यापेक्षा जास्त मोठे दुर्दैव वाटते ते हे की, छत्रपतींनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जी क्रांति घडविली तिचा अर्थ आकळून, त्यातून तत्त्वज्ञान निर्माण करून समाजाला ते शिकविणारा ग्रंथकार कोणी झाला नाही! गौरव करणारे बखरकार, शाहीर झाले हे तरी नशीबच. पण एवढ्याने भागत नाही. शिवप्रभूंनी निर्माण केलेला नवा धर्म त्यावेळच्या किंवा नंतरच्या पंडितांनी ग्रंथनिविष्ट करावयास हवा होता. पण ते दुसऱ्या उद्योगात होते. धर्मसिंधु, निर्णयसिंधु हे ग्रंथ पाहिले म्हणजे त्या वेळचे शास्त्री- पंडित कशात गुंतले होते, त्यांच्या मताने धर्माचे महत्त्वाचे घटक कोणते होते, हे कळून येईल. श्राद्धपक्ष, प्रायश्चित्त, ग्रहणातील आचार, वर्षातल्या २४ एकादश्यांचे पृथक् माहात्म्य, महिन्यातील प्रत्येक तिथीला काय खावे याबद्दलचे विधिनिषेध, हे सर्व कर्मकांड हाच त्यांच्या मते धर्माचा आत्मा होता. आणि दुर्दैव असे की, हीच विचारपरंपरा त्यापूर्वी ४।५ शे वर्षे चालू होती. हेमाद्रीने 'चतुर्वर्गचिंतामणि' हा ग्रंथ लिहिला त्यात हाच विचार आहे. या सर्व ग्रंथांतून इतकी व्रते- वैकल्यै सांगितली आहेत आणि इतके विधिनिषेध, इतकी प्रायश्चित्ते आहेत की, ती आचरताना मनुष्याला समाजसेवा, समाजावर येणाऱ्या आपत्ती, राष्ट्रात निर्माण होणारे भेद, दुही, अराजक, धर्मावर येणाऱ्या आपत्ती, परचक्र, समाजरक्षण, भौतिक विद्या, यांचा विचार करण्यास क्षणभरहि वेळ सापडणार नाही. पण त्याहिपेक्षा मोठी हानि म्हणजे असल्या कर्मकांडात्मक जड आचारधर्मालाच लोक खरा धर्म मानतात ही होय. समाजाचा घात झाला तो यामुळेच. हे आचार पाळले की यवनांची सेवा, फितुरी, स्वजनद्रोह यातले काहीहि केले तरी अधर्म होत नाही, त्यांचा धर्माशी काही संबंध नाही, असा अत्यंत घातकी समज लोकांच्या मनात रूढ झाला. आचारकांडावर संतांनी खप टीका केली आहे. पण तोच धर्म होय, हा समाजाचा भ्रम कधीच नष्ट