पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६४
वैयक्तिक व सामाजिक

इमादशाहीचा संस्थापक फत्तेउल्ला, फिरोझशहाचा वजीर मक्बुलखान, जहांगीरचा वर निर्देशिलेला सेनापति महाबतखान हे सर्व मूळचे हिंदू होते. त्यांना हिंदू असताना जे करता आले नाही ते त्यांनी मुसलमान झाल्यावर करून दाखविले. ते सेनापति झाले, सुलतान झाले. त्यांनी स्वतंत्र राज्ये स्थापिली. अनेक हिंदू राज्ये सहज धुळीस मिळविली. एवढेच नव्हे तर दिल्लीच्या सुलतानी सत्तेलाही पाणी पाजले. जे हिंदूमधल्या मोठ्या घराण्यातल्या चंद्रसूर्य, रामकृष्ण यांचा वारसा सांगणाऱ्या पुरुषांना करता आले नाही ते मुसलमान झाल्यानंतर कोणीही, अगदी कोणीही सहज करून दाखवीत असे. मोठमोठ्या सेना उभारणे, मोठेमोठे प्रदेश पादाक्रांत करणे, स्वतंत्र राज्ये स्थापणे, हिंदु व मुस्लिम राज्येहि सहज बुडविणे, दिल्ली हादरून टाकणे हा कर्त्या मुस्लीम पुरुषांचा नित्याचा खेळ होता. हिंदूंना हा खेळ कधीही खेळता आला नाही.
 इ. स. १००० पासून साडेसहाशे वर्षाची भारताच्या इतिहासाची कहाणी ही अशी आहे. या काळात हिंदूंच्यावर आक्रमण न करील, त्यांना न लुटील, त्यांच्यावर अत्याचार न करील, त्यांच्या धर्माची, स्त्रियांची, मंदिरांची विटंबना न करील तो करंटा ! आरब, तुर्क, अफगाण, मोंगल, सिद्दी, पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज– कोणीही यावे आणि भारतातल्या कोणच्याही प्रदेशाची वाटेल ती धुळधाण करावी, लोकांना गुलाम म्हणून परदेशी नेऊन विकावे, त्यांच्या कत्तली कराव्या, घरादारांवरून नांगर फिरवावे, गावाची होळी करावी, नगरांची राखरांगोळी करावी ! दक्षिणेत, उत्तरेत, पूर्वेला, पश्चिमेला, वायव्येकडे, ईशान्येकडे, कोठेहि हा प्रलय विध्वंस करावा; आणि सत्ता बळकावून दीर्घकाल राज्य करावे. उदार, सहिष्णू, आतिथ्यशील हिंदूंनी हे सर्व सहन केले, चालू दिले, त्या अनर्थाला हातभारहि लावला.
 इतिहासातला हा खरोखर मोठा चमत्कार आहे. एके काळी महापराक्रमी असलेला एखादा समाज दुसऱ्या काळी इतका नादान होईल, इतका अधोगामी, पौरुषहीन, कर्तृत्वशून्य, स्वत्वशून्य होईल याच्यावर विश्वास ठेवणे सुद्धा कठिण जाते. पण प्रत्यक्ष हे घडलेले आहे. याच भूमीत घडले आहे. आणि आपलेच इतिहासकार हे वृत्त सांगत आहेत. तेव्हा त्याबद्दल नुसते खेदोद्गार काढण्यात काहीच अर्थ नाही. अर्थ आहे तो त्याची मीमांसा करण्यात, असे का घडले