पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१५
वैयक्तिक पुण्य व सामाजिक पुण्य

 लेखाच्या प्रारंभी सांगितल्याप्रमाणे पाश्चात्त्यांनी हे शास्त्र पूर्वीच समजून घेऊन गीतेचा लोकसंग्रहाचा संदेश प्रत्यक्षातहि आणला होता. भारतीयांनी मात्र शंकराचार्यांच्या काळापासून टिळकांच्या काळापर्यंत गीता म्हातारपणी वाचण्याचा निश्चय केला होता. संसार सोडण्याची तयारी म्हणून धर्माकडे वळावयाचे असेच येथे ठरून गेले होते. तरुण वयात येथे परमार्थाकडे कोण वळणार ? तर 'संसारदुःखे दुखावले, त्रिविध तापे पोळले, तेचि अधिकारी झाले, परमार्थाचे.' संसारात जे यशस्वी होत असतील त्यांचा व परमार्थाचा, धर्माचा काही संबंध नाही असाच समज येथे रूढ होता. धर्मसेवेसाठी आत्मार्पण करणे ही वृत्तीच येथे निर्माण झाली नाही. कारण धर्म हे परलोकप्राप्तीचे साधन होते. मोक्षाचे साधन होते. पण धर्माला सामाजिक अर्थ प्राप्त होताच सर्व दृष्टिकोनच पालटून जातो. दीन-दलितांच्या दुःखाला कारण होणाऱ्या ज्या सामाजिक रूढी, जी सामाजिक बंधने ती नष्ट करावयाची आहेत, त्यासाठी सत्ताधाऱ्यांशी झगडा करावयाचा आहे हा धर्माचा संदेश म्हणजे तरुणांना आव्हानच आहे. हे कार्य राष्ट्रसेवेचे आहे, विज्ञानाशी, बुद्धीशी त्याचा विरोध नाही, हे पहाताच समाजातील तरुण शक्ति तिकडे आकर्षिली जाते. हे कार्य तरुणपणचे आहे हे तिला पटते. यातल्या उदात्त ध्येयवादामुळे तिचा उत्साह द्विगुणित होतो. आणि त्यामुळे समाज समर्थ होतो. कारण ध्येयवादी तरुण हे राष्ट्राचे मोठे सामर्थ्य आहे.
 तरुणांना ध्येयवादाची स्फूर्ति देणारी धर्म ही फार मोठी शक्ति आहे. राष्ट्रनिष्ठा, समाजवाद हीही तत्त्वे प्रभावी आहेत. त्याहि शक्ति आहेत. पण धर्माच्या तुलनेने त्या शक्ती दुबळ्याच ठरतात असा इतिहासाचा निर्वाळा आहे. मात्र हा धर्म केवळ मोक्षधर्म असता कामा नये. तो अभ्युदयवादी, इहवादी धर्म असला पाहिजे. समाजकल्याण हे त्याचे उद्दिष्ट असले पाहिजे. संसार, प्रपंच, ऐहिक आकांक्षा यांशी त्याचा विरोध असता कामा नये. विज्ञान, बुद्धिनिष्ठा यांची त्याने अवहेलना करता कामा नये आणि तरुण रक्ताला चेतवील असा दलितांच्या उद्धारार्थ अवश्य असलेल्या संग्रामाचा संदेश त्याने दिला पाहिजे.
 क्वेकर पंथाचा संस्थापक जॉर्ज फॉक्स (१६२४ ते १६९१) याने नेमका असाच धर्म स्वजनांना सांगितला. इंग्लंडमध्ये चार्ल्स् राजाने अनन्वित जुलूम