पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
वैयक्तिक व सामाजिक

येणाऱ्या मिशनरी लोकांनी ! येथल्या नगरवासी लोकांची काळजी त्यांना वाटली. भारतीयांना वाटली नाही. त्यांनी ती वाहिली नाही.
 युरोपातल्या गेल्या चारशेपाचशे वर्षांतल्या धर्मपंथांचा, धर्मसंघटनांचा इतिहास आपण पाहू लागलो म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातील संतांच्या धर्मोपदेशाबद्दल हाच विचार मनात येतो. त्यांच्या तत्त्वाप्रमाणे आचरण कोणी केले ? त्यांचा धर्म व्यवहारात कोणी आणला ? युरोपातल्या या धर्मसंघटनांनी. या संघटनांच्या सभासदांनी थोर नीतितत्त्वांचा प्रसार करण्यासाठी विश्वप्रयत्न केले आहेत आणि चालविले आहेत, व त्यायोगे धर्म ही शक्ति जिवंत ठेवून ते समाजाची ऐहिक व पारलौकिक उन्नतीही साधीत आहेत. आणि आपण भारतीयांनी 'निधर्मी' शब्दाचा अत्यंत वेडगळ अर्थ करून आपले जीवन भकास, उजाड, धर्महीन करून टाकले आहे. तोंडाने आपणच खरे अध्यात्मवादी आहोत, युरोप हा जडवादी आहे असा नित्य जप करण्याचे व्रत मात्र आपण निष्ठेने चालविले आहे.
 जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा । ज्यासि आपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी । तुका म्हणे सांगो किती । त्याचि भगवंताच्या मूर्ती ॥ यथासामर्थ्ये यथावित्ते । चित्ते, भावार्थे जीवितें । सुख द्यावे प्राणिमात्राते । हेचि निश्चित निजभजन । मुख्य पूजेचे आयतन प्राणिमात्रा सुखदान ॥ ही वचने आपल्याकडच्या संतांची आहेत. त्यांचा खरा अर्थ कोणी जाणला हें पहावयाचे आहे काय ? एलिझाबेथ फ्रायरचे चरित्र पहा.
 एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या पंचवीस-तीस वर्षांत इंग्लंडमधील तुरुंगातील कैद्यांची काय स्थिति होती हे पाहिले की अंगावर काटा उभा राहतो. लहान-मोठी, सर्व वयाची सर्व माणसे एकाच मोठ्या कोठडीत कोंडलेली असत. स्त्रियांना, पुरुषांना भिन्न दालने नव्हती. सर्व एकत्रच. हवा, स्वच्छता यांचा कसलाही संबंध या कोठड्यांशी नसे. सर्वत्र घाण पसरलेली, अस्ताव्यस्त माणसे पडलेली. अंथरापांघरायला जी पटकुरे असतील ती. व्यवस्था अशी काहीच नसे. जमिनी ओल्या, छपरे गळकी, तुरुंगावरचे अधिकारी अत्यंत क्रूर, शुद्ध लांडगेच असत. अन्नपाण्यावाचून माणसे तडफडून मेली तरी त्यांना परवा नसे. मेलेल्यांची प्रेते चार चार दिवस पडून असत. त्या मृतांचे कपडे