पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हाभारत वाचीत असताना, विशेषतः त्यातील श्रीकृष्णाचे चरित्र व तत्त्वज्ञान अभ्यासीत असताना मनात एक विचार पुनः पुन्हा येत राहतो. या महापुरुषाने जो अत्यंत श्रेष्ठ असा व्यवहारधर्म सांगितला आहे, अभ्युदय व निःश्रेयस् या दोहोंवर समदृष्टी ठेवून प्रपंच यशस्वी करण्यासाठी त्याने जे तत्त्वज्ञान सांगितले आहे, त्याचे प्रत्यक्ष आचरण कोण करतो हे आपण पाहू लागलो तर असे दिसते की, अर्वाचीन काळच्या, गेल्या ४-५ शतकातल्या पाश्चात्त्य लोकांनीच श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. भीष्मांनी केलेले राजधर्माचे प्रवचन वाचू लागलो म्हणजे हेच मनात येते. धनाची महती, बलाची महती, दीर्घ उद्योगाची महती ही भीष्मांनी आणि महाभारतातील इतर कर्त्या पुरुषांनी पदोपदी गायिली आहे. असंतोष हे सर्व वैभवाचे मूळ आहे हाही विचार भारतात अनेक ठिकाणी आला आहे. उद्योग, पुरुष-प्रयत्न यांचे महत्त्व तर महाभारताच्या पानापानावर वर्णिलेले सापडेल. पण ते आमच्या मनावर ठसले नाही. आणि आपण भारतीय दैववादी बनलो. राजा कालाचा नियंता आहे, उत्कर्ष हा मानवी कर्तृत्वावर अवलंबून आहे, हे आम्हाला पटले नाही. आणि मानव कालवश आहे, कलियुगवश आहे हे तत्त्वज्ञान, हा धोंडा उराशी कवटाळून आज शेकडो वर्षे भारतीय जनता कालसमुद्रात खाली खाली जात आहे. 'कृण्वन्तो विश्वमार्यम्' ही प्रतिज्ञा भारतीयांनी चार हजार वर्षांपूर्वी केलेली आहे; पण विश्व दूर राहिले, आणि आर्यावर्तात राहणाऱ्या- गिरिवासी, वनवासी, शूद्र, अंत्यज- इ. सर्व जनांना आपल्या श्रेष्ठ वेदसंस्कारांनी पुनीत करून धर्मदीक्षा देणे हेसुद्धा आपल्याला जमले नाही. मग हे केले कोणी ? तर चार हजार मैलांवरून