पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११२
वैयक्तिक व सामाजिक

 प्रत्येक समाजात भिन्न भिन्न काळी धननिर्मितीची काही विशिष्ट साधने माणूस वापरीत असतो. अगदी प्रारंभीच्या काळी मनुष्याला शेती माहीत नव्हती. त्या वेळी ससा, हरिण, डुक्कर, यांची शिकार करावी, मासे पकडावे व त्यांवर निर्वाह करावा अशी स्थिती होती. ससा, हरिण, मासा हेच त्या वेळचे धन व बाण किंवा कोयता ही त्याच्या प्राप्तीची साधने. पुढे जमीन हे धनसाधन मानवाला उपलब्ध झाले. नांगर, कुळव, दोरखंडे, बैल, घोडा ही त्याची त्या वेळी अर्थोत्पादनाची साधने होती. अरण्ये, खाणी, हीही धनसाधने पुढे उपलब्ध होत गेली. पुढे मग कोष्टी, चांभार, गवंडी, पाथरवट हे लोक भिन्न प्रकारचे धन-निर्वाहसाधन निर्माण करू लागले. पुढे व्यापार सुरू झाला. गिरण्या, कारखाने सुरू झाले. यंत्र, वाफ, वीज यांचा शोध लागून अनंत प्रकारची अवजारे धन निर्माण करू लागली. मोटार, आगगाडी, आगबोट ही वाहने यांचा या अवजारांत आणि म्हणून अर्थोत्पादनाच्या साधनांतच समावेश होतो. धनसाधने बदलतात तशी माणसाची अर्थविनिमयाची साधने व पद्धतीहि बदलतात. पूर्वी नाणी नव्हती. ऐन जिनसी व्यवहार होई. पुढे नाण्यांची पद्धती आली. पेढ्या, हुंडया यांचे अनंत प्रकार सुरू झाले. आणि अर्थविनिमय पहिल्यापेक्षा अगदी भिन्न प्रकारे होऊ लागला. म्हणजे अर्थोत्पादनाची साधने बदलली की विनिमयसाधनेही बदलतात. येथेच हे चक्र थांवत नाही. प्रत्येक प्रकारच्या अर्थसाधनांनी समाजातल्या भिन्न भिन्न गटांचे, वर्गांचे, जातींचे संबंधही निश्चित होत असतात, व त्यामुळे साधने बदलली की हे संबंधही बदलतात. शेतकरी व जमीनदार यांचे जे संबंध असतात त्यांहून मजूर व कारखानदार यांचे संबंध फार निराळे असतात हे आपण आज पाहतोच. गुलाम आणि धनी यांचे नाते त्याहीपेक्षा भिन्न असते हेही उघड आहे. ज्या समाजात वस्तूची देवघेव करणे एवढाच व्यापार असतो त्याहून जेथे मोठमोठे कारखाने महायंत्रोत्पादन करीत असतात त्या समाजातले भिन्न गटांचे परस्परसंबंध फार वेगळे असतात. आणि अर्थ व विनिमय यामुळे कुळ व सरंजामदार, मजूर व कारखानदार, गुलाम व धनी यांच्यातील संबंधच फक्त निश्चित होतात असे नव्हे तर त्या समाजातील राजा व प्रजा, सत्ताधारी व बहुजन, नेते व अनुयायी यांचेही संबंध या अर्थोत्पादन व्यवस्थेमुळेच ठरत असतात असे मार्क्सवादाचे म्हणणे आहे. पण मार्क्स एवढेच म्हणून