पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१११
मार्क्सचे भविष्यपुराण

रशियातील मोठा नेता. लेनिनचा सहकारी. 'हिस्टॉरिकल मटीरियालिझम्-' हा त्याचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यात तो म्हणतो की, ग्रहज्योतिषशास्त्रात सूर्य- चंद्राची ग्रहणे, ग्रहांच्या गती या जशा बिनचूक सांगता येतात तशीच मार्क्सवादात समाजस्थितीविषयी भविष्ये- (अमक्या लढाईच्या वेळी कोणचा पक्ष कसा वागेल, कोणचा वर्ग पुढाकार घेईल इ.) बिनचूक सांगता येतात. मार्क्सने सांगितलेली अनेक भविष्ये तशी खरी ठरली आहेत. (पृ. ४९, ५०) मात्र 'आम्हाला काळ निश्चित सांगता येत नाही. आम्ही गतीची दिशा सांगू शकतो पण वेग मात्र सांगू शकत नाही,' असे पुढे त्यानेच सांगून ठेविले आहे. 'गणितशास्त्रात मुळात दिलेल्या सिद्धान्तावरून पुढील निगमने जितक्या निश्चितपणे सांगता येतात तितक्याच निश्चयाने, भोवतालची परिस्थिती व अर्थशास्त्राची तत्त्वे यांचे सम्यक् ज्ञान झाले तर सामाजिक क्रांती वर्तविता येते' असे एंगल्सचे मत आहे.
 आपल्या भविष्यज्ञानाबद्दलचा मार्क्सवाद्यांचा हा आत्मविश्वास पाहिला म्हणजे यांना ही भविष्ये कशी सांगता येतात याविषयी आपल्याला कुतुहल वाटू लागते. फलज्योतिषामध्ये रवि, मंगळ, बुधादि आकाशस्थ ग्रहांची मानवी जीवनावर सत्ता आहे, तेच मानवाचे भवितव्य निश्चित करतात असा निश्चित सिद्धान्त आहे. त्यामुळे व्यक्तीच्या कुंडलीमधील या ग्रहांचा अभ्यास केला की भविष्य सांगणे सहज शक्य आहे, असे ते शास्त्र म्हणते. अंतर्ज्ञानी साधुपुरुषांचा दुसरा आधार होता. मनुष्य जन्मतो त्याच वेळी ब्रह्मदेव त्याचे सर्व भविष्य त्याच्या कपाळी लिहून ठेवितो असे त्यांचे मत आहे, तपश्चर्येने, परमेश्वरी कृपेने ते जाणण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले की भविष्यकथन सुलभ होते. अशा प्रकारचे कोणचे शास्त्र कम्युनिस्टांना लाभले आहे असा प्रश्न आपल्या मनात येतो. 'ऐतिहासिक जडवाद' हे ते शास्त्र होय. विरोधविकासवाद, ऐतिहासिक जडवाद, वर्गविग्रह व श्रममूल्यसिद्धान्त ही मार्क्सवादाची मूलतत्त्वे होत. त्यांत ऐतिहासिक जडवादाला फार महत्त्व आहे. कोठल्याही समाजाचे भवितव्य जाणता येते, त्याचे भविष्य वर्तविता येते ते याच शास्त्राच्या आधारे. असे असल्यामुळे या ऐतिहासिक जडवादाचे स्वरूप प्रथम आपणांस समजून घेतले पाहिजे; त्यावाचून मार्क्सच्या भविष्यपुराणाची आपल्याला कल्पना येणार नाही. म्हणून या तत्त्वाचे थोडे स्पष्टीकरण करू.