पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
वैयक्तिक व सामाजिक

 जुन्या काळी पुष्कळसा भर वैयक्तिक जीवनातील भविष्य जाणण्यावरच असे. विवाह, पुत्रप्राप्ती, धनलाभ, सत्ता, राजकृपा यांची प्राप्ती यांचा आपल्या आयुष्यात योग केव्हा आहे, हे जाणण्याचीच माणसांची उत्सुकता जास्त असे. आणि ज्योतिषी त्याचाच अभ्यास जास्त करीत. पण एकंदर समाजाच्या भवितव्याचा अभ्यास मुळीच नसे असे मात्र नाही. पुढे कलियुग येईल, चातुर्वर्ण्याचा नाश होईल, लोक पापी होतील इ. सामाजिक भविष्येही मागे वर्तवीत असत. भविष्यपुराणात अशी भविष्यें सांगितलेली आहेत आणि शिवाय 'व्हिक्तूरिया, एडवर्डो यांचे राज्य होईल' यासारखी भविष्येहि वर्तविलेली आहेत. एके ठिकाणी 'राज्ञी च विकटावती' असा व्हिक्टोरियाचा उल्लेख आहे. अन्यत्र ॲडॅम आणि ईव्ह यांचाही 'आदमो नाम पुरुषो, राज्ञी हव्यवती तथा' असा उल्लेख आढळतो. म्हणजे एकंदर समाजाच्या भविष्याचेही ज्ञान तेव्हा शास्त्रज्ञांना होत असे, असे दिसून येईल. मार्क्सवाद मात्र फक्त सामाजिक भविष्येच सांगतो. क्रांती केव्हा होईल, भांडवलदारांचा नाश केव्हा होईल, कामगारांना राज्यलाभ होईल की नाही, सत्तेचा लाभ कोणाला होईल, या तऱ्हेचीच भविष्ये मार्क्सवादी वर्तवितात. विवाह, पुत्रलाभ, धनलाभ, नोकरी, व्यापारात बरकत इ. घटनांविषयी भविष्ये ते सांगत नाहीत. म्हणजे आज तरी सांगत नाहीत. पुढे ते काय करतील याचे भविष्य मला आज वर्तविता येणार नाही.
 आपल्या पंथाच्या संस्थापकांना व त्यांच्या अनुयायांना प्राप्त झालेल्या या सिद्धीविषयी अनेक मार्क्सवादी पंडितांनी सविस्तर लिहून ठेवलेले आहे. "भविष्यकाळातील इतिहासाच्या घडामोडी कशा होणार हे आधी जाणण्याचे शास्त्र निर्माण करणारा कार्ल मार्क्स हा आद्य पुरुष होय. त्याचा मित्र एंगल्स यालाही भविष्यकाळ अगदी बिनचूक व तपशिलासह जाणण्याची प्रज्ञा होती. लेनिनचीही प्रतिभा या शास्त्रात निरंकुश होती. मार्क्सची सर्व भविष्ये अगदी तंतोतंत बरोबर आलेली पाहून आपण आश्चर्याने थक्क होतो." अशी डिवॉरिन या लेखकाने साम्यवादातील श्रेष्ठ भाईची प्रशंसा केलेली आहे. (मार्क्सिझम अँड मॉडर्न थॉट- पृ. ९१- ९७) मार्क्सने भांडवलशाहीच्या विकासाचा सिद्धान्त शोधून काढला आणि त्यावरून तिच्याविषयी जे भविष्य वर्तविले ते आज पन्नास वर्षांनी अक्षरश: खरे ठरत आहे असे त्याच ग्रंथात टिमेनिव्ह या लेखकाने म्हटले आहे. (पृ. ३१६) निकोलाय बुखारिन हा सोव्हियेट