पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
वैयक्तिक व सामाजिक

हे जर लेनिनला दिसत होते तर बुद्धिजीवी वर्गाचा जातगुणच क्रांतिविरोधी आहे, ते भांडवलदाराचे दास असतात अशी त्यांची निर्भर्त्सना पावलोपावली जी त्याने केली आहे ती कशासाठी ? काही वेळा या विद्यावंतांनी कम्युनिस्ट क्रांतीला विरोध केला होता हे खरे. पण तसा कामगारांनीही केला होता. आणि इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स येथे तर त्यांनी कम्युनिस्ट क्रांतीची पाळेमुळे खणून टाकली आहेत. यावरून आर्थिक स्थितीवर गुण अवलंबून नसतात हे लेनिनच्या व इतर कम्युनिस्टांच्या ध्यानात येण्यास हरकत नव्हती. पण भगवान् मार्क्सने हे धर्म समस्त प्रजांना, आणखी लावून दिलेले आहेत, त्याला कम्युनिस्ट काय करणार ? वचनात् प्रवृत्तिः, वचनान्निवृत्तिः। अशी त्यांची बिचाऱ्यांची स्थिति आहे ! बुद्धिजीवी विद्यासंपन्न वर्ग हा नेहमी दगलबाज, प्रतिगामी, गुलामी वृत्तीचा, लाचार असतो व कामगारवर्ग पुरोगामी, क्रांतिकारक आणि नेतृत्व- गुणसंपन्न असतो हे त्यांनी घोकलेच पाहिजे. पां वा. गाडगीळ हे मार्क्सवादी आहेत. त्यांनी 'रशियन राज्यक्रांति' या आपल्या पुस्तकात कामगारांचा पुढीलप्रमाणे गौरव केला आहे. "यांत्रिक उत्पादनाने औद्योगिक क्रांती घडून आल्यावर तिच्या पोटी उदय पावलेल्या संघटित, वर्गजागृत व कार्यतत्पर अशा मजूरवर्गाने ध्येयवादी व क्रांतिशास्त्रनिपुण अशा पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आणि शेतकऱ्यांचे साह्य घेऊन रशियात क्रांती घडवून आणली." यावर भाष्य करण्याची जरूर नाही असे वाटते. एका छापखान्यांतील कामगारांनी प्रकाशकाच्या साह्याने, पां. वा. गाडगिळांच्या नेतृत्वाखाली, 'रशियन राज्यक्रांति' हा ग्रंथ रचला असे म्हणण्यासारखेच हे आहे. स्तुतीच्या नावाखाली आपली ही चेष्टा चालविलेली आहे, हे कामगारांच्या सहज ध्यानात येईल.
 रशियात बोल्शेव्हिकांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन कामगारांनी प्रचंड उठावणी केली हे खरे आहे. पण त्या उठावणीत त्यांच्याइतक्याच संख्येने सैनिकही सामील झाले होते हे आपण विसरता कामा नये. पुढे त्याच्या दसपट संख्येने रशियन शेतकरीहि या चळवळींत प्रविष्ट झाला तेव्हा क्रान्तीचे यश प्रत्यक्षांत येऊ लागले. शेतकऱ्याच्या साह्यावाचून कोणतीहि क्रान्ति कधीही यशस्वी होणार नाही हें मार्क्स व त्याचे लेनिनसुद्धा सर्व अनुयायी यांना पूर्ण मान्य आहे. शेतकऱ्यांचे साह्य मिळवा असा लेनिनने ठायी ठायी आपल्या