पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९७
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

अनुयायांना उपदेश केला आहे. असे असूनही क्रान्तीचे नेते म्हणजे कामगारच असा मार्क्सचा, लेनिनचा व एकंदर मार्क्सवाद्यांचा आग्रह मात्र कायम आहे. शेतकऱ्याला क्रान्तीचे सामर्थ्य आहे हे ते कधीही मान्य करणार नाहीत.
 मार्क्सवादाने कामगारांच्या सामर्थ्याची जी भरमसाट वर्णने केली आहेत त्यांत त्याच्या कल्पनेच्या शतांश जरी तथ्य असते तरी लेनिनच्या मागून स्टॅलिनने एकंदर रशियन जनतेची जी दुर्दशा करून टाकली ती त्याला शक्य झाली नसती. कामगार हे स्वतः भांडवलशाहीच्या मगरमिठीतून मुक्त होणारच; पण येथे त्यांचे कार्य संपत नाही. ते सर्व समाजाला त्यातून मुक्त करणार. भांडवलशाही, जमीनदारी, जातीय सत्ता, धर्मसत्ता यांचा ते नायनाट करणार. कसल्याही प्रकारचा अन्याय, जुलूम, विषमता ते सहन करणार नाहीत. आपल्या संघटनेच्या जोरावर ते सर्व प्रकारची विषमता नष्ट करून समता, व्यक्तिस्वातंत्र्य या पायावर लोकायत्त समाजाची निर्मिती करणार. कामगाराचे हे ऐतिहासिक कार्य आहे. आणि रशियन कामगार ते निश्चयाने पार पाडणारच याविषयी कुणीही शंका घेता कामा नये अशी त्यांची स्तोत्रे मार्क्सवादाने गायिली आहेत.
 अशा या सर्वगुणसंपन्न, सर्वसत्ताधीश कामगारवर्गाची आज रशियात काय स्थिति आहे हे पाहिले म्हणजे मार्क्सच्या सिद्धान्ताची अशास्त्रीयता आपल्या ध्यानात येते. विषमता, जुलूम, अन्याय हेच रशियाच्या शासनाचे सध्या लक्षण आहे. लक्षावधि कामगार सैबेरियात कोंडवाड्यात पशूच्याही खालच्या अवस्थेत जीवन कंठीत आहेत. सत्ताधाऱ्यांची मर्जी फिरताच कोणालाही मध्यरात्री बायकामुलांतून कुत्र्यासारखे ओढून नेऊन फाशी देण्यात येते. विरोधी पक्ष स्थापण्याची कोणालाही परवानगी नाही. मुद्रणस्वातंत्र्याचें तर नावही नाही. सर्व मुद्रण सरकारच्या नियंत्रणात आहे. कामगारांना संघटना करण्याचे अथवा साधा संप करण्याचेही स्वातंत्र्य नाही. इतकेच नव्हे तर एक नोकरी सोडून दुसरी करण्याचे वा एक प्रांत सोडून दुसरीकडे जाण्याचेही स्वातंत्र्य नाही. कामगार हा साम्राज्यशाहीचा कट्टा शत्रू. त्याच्या देखतच व त्याच्या शरीरशक्तीला वेठीला धरूनच रशियाने हंगेरी, पोलंड, रुमानिया इ. देशांवर साम्राज्य स्थापन केले आहे. तेथील जनतेला ते कितपत मान्य आहे ते तेथे वरचेवर होणाऱ्या बंडाळ्यांवरून
 वै. सा. ७