श्री. ज्ञानेश्वर मुळे हे मूलतः हरवलेले जीवन शोधणारे कवी. त्यांच्या कविता एका अर्थाने स्वगत होत. आपण काय गमावले नि कमावले याचा न मांडलेला अमूर्त हिशेब त्यांच्या अवचेतन मनात सतत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करत असतो. यातून त्यांना आपल्या कवितेचे सामर्थ्य लक्षात येते नि मर्यादाही. हा कवी जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा आहे. आकाशात मन झेपावत असले तर आपल्या मातीच्या पायाचे भान या कवीस आहे.
मैंने हमेशा बचाया है अपनी कविताओं को
अर्थहीनता से
सारख्या ओळीतून ते जाणवते.
‘दुख की सारणी में क्या उगा सकता हूँ उन्मेष की कलियाँ?'
असा प्रश्न करणारा कवी एका अर्थाने आत्मभानच स्पष्ट करतो. ‘शब्दों के शृंगार से बारिश नहीं होती' म्हणणाऱ्या कवीस आपली कविता शब्दप्रभू आहे, कलात्मक नाही याचे भान असल्याची प्रचिती देते. मराठी कवी हिंदी कविता लिहितो तेव्हा फार कमी लोकांना ही जाण असते. एका अर्थाने हे या कवीचे प्रौढत्वच होय. जाणिवेचे प्रौढत्व!
मैं हमेशा वर्तमान हूँ' म्हणणारी ज्ञानेश्वर मुळेची “ऋतु उग रही है 'मधील कविता आधुनिक उपमाने घेऊन येणारी असल्याने अधिक जवळची वाटते. तीत इंडिका, मारुती, कॉरिडॉर, निर्मल वर्मा, गुरुदयालसिंह, दिल्ली, तोक्यो, बेळगाव, मंगोलिया सारे असते. त्यामुळे ती वैश्विक परिदृश्य निर्माण करते. ही कविता यंत्र बनत चाललेल्या मनुष्याचे मृत्यूगीत गात तुम्हास भावना, संवेदना, प्रेम, निसर्ग, आत्मीयता, मातीची ओढ, देशप्रेमसारख्या भावना जपण्याचे आव्हान करते. कवीचा हा हिंदीतील पहिला प्रयत्न पाहता तो वाचकांच्या मनात मोठ्या आशा जागवतो. मराठी कवितेस वैश्विक पटलाचे भान देणारी ही कविता मराठी कवींनी जरूर वाचायला हवी.
लेखक - ज्ञानेश्वर मुळे
प्रकाशन - आलोकपर्व प्रकाशन, दिल्ली
♦♦