पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'तिस-या बिंदुच्या शोधात' : स्त्री विकासाची मार्मिक समीक्षा


लोकसाहित्याच्या व्यासंगी संशोधक डॉ. तारा भवाळकर मराठी साहित्य समीक्षेच्या प्रांतात स्त्रीवादी चिकित्सक म्हणून सर्वश्रुत आहेत. गडक-यांच्या साहित्यातील स्त्री प्रतिमांचे चित्रण त्यांनी ‘प्रियतमा' (१९८५) मध्ये केले आहे. डॉ. रा. चिं. ढेरेंसारख्या ज्येष्ठ संशोधकांबरोबर त्यांनी लिहिलेले ‘महामाया' कोण विसरेल? ‘लोकसाहित्यातील स्त्री प्रतिमा' (१९८९) स्त्री मुक्तीचा आत्मस्वर' (१९९४) 'माझीये जातीच्या' (१९९५), ‘मायवाटेचा मागोवा (१९९८) सारख्या संशोधनपर समीक्षा लेखनानंतर नुकतेच हाती आलेले ‘तिस-या बिंदूच्या शोधात' (२00१) पुस्तक स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. हे पुस्तक त्यांच्या पूर्वप्रकाशित लेखांचा संग्रह आहे. एकाच दृष्टीने नि शोधाची विशिष्ट दिशा ठरवून केलेले हे वैविध्यपूर्ण लेखन एकत्र वाचण्याने समीक्षक लेखकाची दृष्टी समजून घेण्यास उपयोगी ठरते. पुस्तक वा ग्रंथरूप लेखनाचा एक फायदा असतो. लेखक आपल्या मनोगतात लेखना मागील आपली भूमिका व उद्देश वाचकांपुढे स्पष्ट करत असतो. डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या ‘तिस-या बिंदूच्या शोधात' च्या प्रारंभी निवेदन' व 'थोडी पार्श्वभूमी' शीर्षकांतर्गत जो मजकूर लिहिला आहे, तोही अशी भूमिका स्पष्ट करणारा आहे.

 डॉ. तारा भवाळकरांनी वेळोवेळी पाहिलेले चित्रपट नि नाटके, वाचलेल्या कथा, कादंबच्या, चरित्रे, आत्मचरित्रे यांची स्त्रीवादी परिदृष्टीतून केलेली चिकित्सा करणाच्या लेखांचा संग्रह ‘तिस-या बिंदूच्या शोधात' आहे. ‘शोधात या नावातच शोध सुरू असल्याचे, तो न लागल्याचे, त्यामुळे हाती पूर्ण सत्य न गवसल्याची कबुलीच लेखिका देते. स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याच्या उद्देशाने झालेल्या या लेखनात डॉ. भवाळकर माहेर नि सासरच्या परीघाबाहेर माणूस म्हणून स्त्रीची ओळख नाटक, चित्रपट, कथा, कादंबरी, आत्मकथनांतून होते का, तिच्या विकासाचा तिसरा प्रस्थान बिंदू कुठे सापडतो का, याचा शोध घेते. स्त्री पुरुषांनी आजवर केलेल्या लेखन, चित्रणातून स्त्रीवादी दृष्टीने समीक्षा, चिकित्सा, शोध घेतल्यास तिसरा विकास बिंदू

वेचलेली फुले/७७