Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘ऋतू उग रही है' : स्थलांतरित मनाच्या कविता


 ‘जोनाकी', 'माती, पंख आणि आकाश' व दूर राहिला गाव' सारख्या साहित्य कृतीमुळे मराठी रसिकांना परिचित असलेले ज्ञानेश्वर मुळे हे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होत. परदेश सेवेत नियुक्ती झाल्याने त्यांना जपानच्या राजदूतावासात जावे लागते. टोकियोसारख्या महानगरात राहात असताना त्यांचे मन मात्र मातीकडे सतत ओढ घेत राहते. मोठ्याने ओरडता येत नाही, झाडावर दगड मारता येत नाही, आई गं म्हणून ठेच लागली तरी धीर द्यायला कोणी असत नाही, आक्काच्या पदराला तोंड नाही पुसता येत... म्हटले तर साधे हरवलेले जीवन... पण त्याने होणारी शरीर, मनाची तडफड... त्यातून कविता साकारते... त्या कवितेत स्थलांतरित पक्षाची तगमग, कासावीस क्षणोक्षणी प्रतिबिंबित होते. कधी प्रेयसीची आठवण, कधी पत्नीचा विरह, मित्राची प्रतीक्षा, ऋतूंचा बहार, बैठका, शिखर परिषदा, मंत्र्यांचे दौरे, पंचतारांकित संस्कृती या सर्वातून कवी हरवलेले पाथेय सतत शोधत राहतो. 'ऋतु उग रही है' हा ज्ञानेश्वर मुळेचा हिंदी काव्यसंग्रह. मराठी भाषा कवीने हिंदी कविता लिहिणे ही स्वागतार्ह गोष्ट असली तरी लक्ष्य भाषेचे सामर्थ्य, सार्थक्य प्रतिबिंबित व्हायचे तर ती भाषा आत्मीय व्हावी लागते. तशी ती न झाल्याने ऋतु उग रही है' मधील कविता भाव, बिंब, शिल्प सर्वांगानी वाचकास स्पर्श करत असल्या, तरी भाषिक सहजतेच्या अभावी हृदयास भिडत नाहीत, भेदत नाहीत.

 'ऋतु उग रही है'मधील अधिकांश कविता जपानमध्ये लिहिलेल्या. परदेशातील वास्तव्यात स्वदेशाचे हरवलेपण अधिक आठवत राहात, खटकत राहते, बेचैन करते. पूर्वस्मृतींना उजाळा, गतकाळातील स्मृतींची एकांत रवंथ एकटेपणाची खरी सोबत होते. या भावभूमीच्या ब-याचशा कविता. काही दिल्ली, बेळगावच्या मुक्कामात जन्मलेल्या. कवितेचा रचनाकाळ गेल्या पाच वर्षांचा. त्यामुळे या कवितेत वाचकास नुकत्याच खुडलेल्या फुलांची ताजगी नि गंध दोन्ही अनुभवास येतात. कवीचे निसर्गाशी जितके अतूट नाते तितकेच जीवन, जगण्याचे संदर्भ परिरातील वस्तू नि वास्तूशीपण! या संग्रहातील कवितेचे विषय, प्रेम, प्रणय, राजनीती, समाज जीवन

वेचलेली फुले/७४