Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगली जाण आहे. सामाजिक प्रश्न व समस्यांची त्यांना जाणीव आहे. धर्म नि विज्ञान या परस्परविरोधी विषयांवर असलेली त्यांची रुची व गती पाहता तसेच छायाचित्रण व चित्रकलेतील त्यांचा हात व डोळा लक्षात घेता त्यांचे लेखन हे व्यक्तिमत्त्वाप्रमाणे बहुआयामी व बहुरसायनी आहे हे जागतिक घडामोडी' वाचताना सहज ध्यानात येते. युद्ध, पर्यावरण, पुरस्कार, क्रांती, परिवर्तन, वैचारिक आवर्तने या सा-यांच्या वाचन, मनन, चिंतन, निरीक्षणातून फुलणारे त्यांचे लेखन हे आजच्या माहितीच्या विस्फोटाप्रमाणे अवाक् करणारे आहे. यातून लेखकाचा आवाकाही लक्षात येतो.
 वृत्तपत्रीय लेखनात ब-याचदा रतीबाची रूक्षता येण्याचा संभव असतो. डॉ. देसाई यांनी विषय वैविध्याने ती टाळली आहे. स्तंभलेखनात जागेची मर्यादा असते. तशी वेळेची पण, अल्पवेळेत समग्र संदर्भ देण्याचे डॉ. देसाईंचे ‘जागतिक घडामोडी'तील कौशल्य त्यांच्या व्यापक समजेचा परिचय करून देते. ते केवळ घटनांची नोंद करत नाहीत तर घटनेच्या अनुषंगाने उठणारी संभाव्य वैचारिक आवर्तने ते सूचित करतात. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पुढे येणाच्या संकटांच्या इशा-याचा घंटानाद त्यांच्या लेखनातून ते सुज्ञ वाचक ऐकतील त्यांना हे पुस्तक म्हणजे एकविसाव्या शतकातील बदलाची ‘ब्ल्यू प्रिंट'च वाटेल, दैनिक पुढारीसारख्या राज्यस्तरीय होऊ पाहणाच्या वृत्तपत्रास भविष्यात जो दर्जा मिळेल त्याचे श्रेय य दर्जेदार ग्रंथासही द्यावे लागेल.
 आजचे युग स्पर्धात्मक आहे. रोज सारं विश्व अल्पकाळात नि कळ दाबताच आपल्या मुठीत यावे असे ज्या वाचकांना वाटते त्यांना जागतिक घडामोडी' हा संदर्भ ग्रंथ 'गागर में सागर' वाटल्यावाचून राहणार नाहीत. १९९७-९८ या दोन वर्षांचा साक्षेपी इतिहास या ग्रंथरूपाने नोंदला गेला आहे. गेल्या दोन वर्षांतील जगाचे प्रतिबिंब ज्यांना पहायचे, अभ्यासायचे असेल अशा मराठी वाचकांसाठी आज तरी या ग्रंथाशिवाय पर्याय नाही.


जागतिक घडामोडी (लेखसंग्रह)

 लेखक डॉ. सुभाष देसाई,

 प्रकाशक - सिंहवाणी, ११-ब शिवाजी स्टेडियम,खासबाग, कोल्हापूर
 प्रकाशन - फेब्रुवारी १९९८
 पृष्ठे - १६0 किंमत - १२५ रु. (विद्यार्थ्यांसाठी फक्त १00रु.)

♦♦

वेचलेली फुले/६५