पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिठू मिठू पोपट : स्त्रीवादी विचाराचे नाटक


 ‘मिठू मिठू पोपट' हे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे सन १९६८ ला लिहिलेले छोटेखानी नाटक. सध्याचा समाज स्वत:ला आधुनिक म्हणवून घेतो खरा पण तो प्रवृत्ती, संस्कार, विचाराच्या अंगांनी पारंपरिकच राहिला आहे, हे दाखवणे हा नाटकाचा उद्देश होय. उदाहरण म्हणून नाटककारांनी समाजातील स्त्रीच्या स्थानाची चिकित्सा नाटकात केली आहे. विद्यमान समाजातली स्त्री विशेषतः मध्यवर्गीय स्त्री ही स्वत:ला कितीही सुशिक्षित म्हणून घेत असली, तरी ती प्रवृत्तीच्या अंगांनी, संस्कारांनी पारंपरिकच राहिली आहे. नऊवारी गेली नि पाचवारी, मॅक्सी, कमीज-कुर्ता, स्कर्ट जरी घालू लागली तरी तिने समाज, घर, कुटुंबाच्या लक्ष्मणरेषा काही ओलांडल्या नाहीत. किंबहुना, ती पूर्वीच्या स्त्रियांसारखी दांभिकच राहिली. नऊवारी नेसत चिरूट ओढणारी चित्रेनी चितारलेली यातली स्त्री ही प्रतीकात्मक असली तरी ती प्रातिनिधिक वास्तव व्यक्त करणारी होय. घर, कुटुंब, समाजाचे हुकमी संरक्षण कवच, पिंजरा तिला सोडवत नाही. पिंज-याबाहेरचे स्वच्छंदी जग ती उपभोगू इच्छिते. पण त्याच्या परिणामांना स्वीकारण्याचे बळ (मानसिक तयारी) तिच्यात नाही. परिणामी स्वच्छंद सुखाचा चोरटा आनंद घेण्यास चटावलेली आधुनिक स्त्री धड पारंपरिक पतिव्रताही राहिली नाही नि आधुनिक स्वैर स्त्रीही झाली नाही. पुरुष म्हणाल तर तो कृष्ण, विश्वामित्राची भूमिका अधिक सफाईदार नि सभ्यतेने निभावतो आहे. कच्ची डाळ, कैरी खाण्यास चटावलेला हा संभावित पोपट स्त्रीच्या सुखी संसाराचे रहस्य जाणून असल्याने त्याने मर्म ओळखल्याने तो अधिक धाडसीही झाला आहे. सुखी संसाराचे सात जन्माचे आश्वासन मागणारी स्त्री आपली पराधीनताच सिद्ध करते. पुरुष याचाच फायदा उठवत आला आहे. उठवत राहणार. जो स्त्री स्वप्रज्ञ, स्वतंत्र होत नाही.

 चित्रे यांनी आपल्या या विचारांना तमाशासारख्या हलक्या फुलक्या नाट्य प्रकाराद्वारे गंभीर प्रश्न मांडण्याचा जबाबदार प्रयत्न केला आहे. विचारांची मांडणी छोट्या छोट्या संवादाद्वारे केली असली, संवाद प्रेक्षकांना हसवणारे असले तरी त्यात अंतर्मुख करण्याची ताकद आहे. 'मिठू मिठू पोपट' ‘आंबा

वेचलेली फुले/६६