हे लेखन कधी वृत्तपत्रे, नियतकालिकांकडे अभिप्रायार्थ येणा-या ग्रंथांचे परीक्षण करण्यातून घडले, कधी शिक्षक, मित्र, सहकारी, परिचितांच्या आग्रहातून, तर कधी उत्स्फूर्त? ‘जे आपणाशी ठावे ते दुस-याशी सांगावे' अशा इच्छेतून हे घडत गेले. यातून माझे विचारपूर्वक वाचन रुंदावले. छंद, मनोरंजन, जिज्ञासा म्हणून वाचणे आणि लेखनासाठी वाचणे यात अंतर असते. लेखनासाठी केलेले सहेतुक वाचन सतर्क, चोखंदळ असते. साहित्य वा लेखन कृतीचा विषय, आशय, शैली, साहित्य प्रकार, नर्मबिंदू, बलस्थान असा चिकित्सक धांडोळा घेत वाचत गेले की ते वाचन मनावर कायमस्वरूपी ठसते. परीक्षणकर्त्यांची ही खरी मिळकत असते. असे लेखन वेचलेल्या फुलांसारखे असते. पारिजात, बकुळ, जाई, जुई, मोगरा, या झाडा वेलींखाली आपसूक पडलेली फुले। अंगणात सर्वत्र सडा असतो त्यांचा! कितीही डोळे भरून पाहा, मन:पूर्वक हुंगा, ती कधीच मन भरू देत नाहीत. चाफा, गगनजाई, पारिजातक, जाई, जुई, मोगरा त्यांची कितीही फुले वेचा, लक्ष जाते ते न वेचलेल्या फुलांकडे. निसर्ग जसा समृद्ध तसे आपले साहित्य! फुलांनी भरलेले अंगण मला आकाशगंगाच वाटते! दोन्हींचे सौंदर्य व अतृप्ती एकच! कथा, कादंबरी, कविता, आत्मकथा, लेखसंग्रह, चरित्र, विवरणात्मक ग्रंथ, स्मृतिग्रंथ, अहवाल, संस्था परिचय, पुस्तिका, करुण कथा, अनुवाद, आलेख, भाषणे, सूक्तीसंग्रह, प्रवास वर्णन, चिंतनपर लेखन, नाटक, नवसाधन संवाद हे सारे आकाशगंगेतील ता-यांपेक्षा कमी का आकर्षक व वैविध्यपूर्ण असतात? वैविध्यातील वैभव म्हणजे साहित्य! हे सारे साहित्य प्रकार जीवनाचे विविध पक्ष समजावतात व जीवनाचे बहुपेडी रूपही! प्रत्येक लेखकाची लेखनाची हातोटी वेगळी. प्रत्येकाचे जग वेगळे. अगदी हौसेने लिहिणा-याकडेही सांगण्यासारखे भरपूर असते. यातून जीवनाचे संपूर्ण, समग्र प्रतिबिंब साहित्यात पडत असते. विविध प्रकारचे साहित्य वाचनच तुम्हाला समृद्ध करते. अशा सर्वांगीण साहित्य परीक्षणातून तुमचे आकलन संपन्न होते. पुस्तक परिचय, परीक्षण लेखन वाचकांना मार्गदर्शक असले, तरी परीक्षणकर्त्यास ते प्रौढ नि प्रगल्भ करते, ते त्यांच्या जाणिवा रुंदावत.
‘वेचलेली फुलं' समीक्षा संग्रहात मराठी, हिंदी, इंग्रजी अशा त्रैभाषिक ग्रंथांची परीक्षणे व परिचय आहे. प्रामुख्याने मात्र मराठी ग्रंथच यात आहेत. गीतकार गुलजार, सिनेदिग्दर्शक सत्यजीत रे, ज्ञानपीठ विजेते कन्नड कादंबरीकार डॉ. यू. आर. अनंतमूर्ती, समाजशास्त्र डॉ. शरदचंद्र गोखले, कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, साहित्यिक उत्तम कांबळे, लोकसाहित्य अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, बाल साहित्यिक रा. वा. शेवडे गुरुजी, नाटककार अतुल पेठे,
पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/5
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.