Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ओंजळीतली फुले

 'वेचलेली फुले' हा वृत्तपत्रे, नियतकालिके, ई-जर्नल्सवर वेळोवेळी प्रकाशित परीक्षणांचा संग्रह होय. मी पीएच.डी. झाल्यानंतरच्या काळात स्वास्थ्याने वाचू, लिहू लागलो. वाचलेले भावायचे. भावलेले दुस-याला सांगायची विलक्षण ओढ मी तिशीत असताना होती, असे मागे वळून पाहताना लक्षात येते. त्या ओढीतून मी वाचलेल्या पुस्तक, साहित्यकृतींबद्दल लिहीत असे. लिहिलेले वृत्तपत्र, नियतकालिकांना पाठवत असे. सन १९८0 ला जोपासलेला हा छंद सत्तरीच्या उंबरठ्यावरही तसाच नि तितकाच तीव्र आहे, याचा मला आनंद आहे. माझ्यातील वाचन, लेखनाची प्रेरणा चार दशकांनंतरही तितकीच ताजीतवानी आहे.
 वाचनाचा छंद ऐन गद्धेपंचविशीत जोशात असतो. जगातले सारे वाचावे असे वाटण्याचा तो काळ! मनाची पाटी कोरी असताना साहित्य, विचार, संस्कृतीच्या जाणिवा तेवढ्या प्रगल्भ असत नाहीत. वाचेल ते नवे असते. ते एकीकडे तुमचे डोळे विस्फारत असते, तर दुसरीकडे डोके विस्तारत राहते. 'चांदोबा', 'गोकुळ', 'कुमार', 'अमृत' मासिकांनी बालकुमार वयात माझे वाचक मन छेदी बनवले. पुढे 'मनोहर', 'माणूस', 'बहुश्रुत माला', 'समाजशिक्षण माला' या नियतकालिकांतील लेख व पुस्तकांनी माझे कुमार, किशोरवय पोसवले. तरुणपणात 'साधना', 'किर्लोस्कर', 'स्त्री', 'सोवियत लँड', 'लाइफ', 'ललित', 'नॅशनल जिऑग्राफिक' मासिकांनी वाचन कक्षा रुंदावली, प्रगल्भ केली. पुस्तक वाचन बालकुमार साहित्याकडून हेर कथा, शृंगार कथा, प्रवासवर्णन, चरित्रे असा प्रवास करत तिशीच्या जवळपास अभिजात झाला. रंजक व बोधकातील फरक उमजला तो शिक्षक झाल्याने प्राध्यापक झाल्याने वेचक वाचन पठडी बनून गेली. नेमका याच वेळी मी लिहू लागलो. पीएच.डी. मुळे वाचन, लेखनास वैज्ञानिक बैठक लाभली. समाजात वाचन संस्कृती रुजायची तर वेचक साहित्याबद्दल आवर्जून लिहायला हवे, या जाणिवेने मी वाचलेल्या साहित्यकृतीबद्दल लिहू लागलो. या लेखनाचा बाज प्रेरणा, परिचय, परीक्षण असा असला तरी ‘वाचन प्रेरणा त्याचा उद्देश होता.