पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजायला ‘आमार मेयेबेला'तून जावे लागते. ही एक भन्नाट, बिनधास्त मैत्रीण... शिक्षकांवर वात्रटिका लिहायच्या असो वा कावळे ओरडायच्या आधी भावाची सायकल घेऊन मैत्रिणीच्या घरी जाऊन तिच्या अंथरुणात शिरायचे असो... ते करावे चंदनानीच... तिच्या उधाण वाच्यात तसलिमा केव्हा सखी, सजनी, प्रियतमा, राजकन्या होऊन जाते ते कळतही नाही... चंदनाने केव्हाही मूठ उघडली की, तिच्यातून आषाढातला पावसासारखा प्रेमवर्षाव होत राहायचा. अहा ते सुंदर दिन...' वाचणे म्हणजे आपले किशोरपण पुन्हा जगणे! तसलिमाच्या लेखणीचं लालित्य नि शैलीचा पदन्यास म्हणजे सारे वर्णन!

 तसलिमा मॅट्रिकला जाते, तेव्हा चौदावे लागले होते. मॅट्रिक परीक्षेसाठी त्या वेळी पंधरा वर्षांची अट. म्हणून वडिलांनी एक वर्ष वाढवले. आई उदार, वडील कंजूस, वाढदिवस साजरा नाही करायचे. का, तर खर्च होतो. तसलिमाने तेव्हापासून वयाचा विचारच सोडून दिला. पण वय तिचा पाठलाग सोडत नव्हते. झाले, आयुष्यातले हाती आलेले पहिले प्रेमपत्र! अवघे एक ओळीचे ‘डोळे मनातली गोष्ट सांगतात... तुझा लुत्फर' तेही वडिलांना मिळावे, यासारखा धरणीकंप तो दुसरा कोणता? झाले, पहारा बसला. बडोदाच्या (मोठा भावाचा) पहा-यात शाळेत जाणे-येणे, मोठे अपराध्यासारखे वाटायचे. बरेच दिवस दुसरे पत्र न आल्याने, मग हा पहारा उठतो. आवासिक आदर्श बालिका विद्यालयाच्या चंदना, ममता, संजीदा, फाहमिदा, आसमा, नादिरा, अशरफन्निसा इत्यादी मैत्रिणींत तसलिमा आपल्या घरचा छळ विसरायचा प्रयत्न करायची.

 प्रेम, प्रणयाच्या दुनियेतून ती कवितेच्या कलाप्रांतात रममाण झाली ते वाचन वेडामुळे. कुठेही कसलाही मुद्रित, अमुद्रित शब्द दिसल्याबरोबर वाचणारी तसलिमा लिहू लागली. सबिना, रुबिना या आपल्या मैत्रीणींवर लिहिलेला लेख ‘चित्राली' मासिकात छापून आला नि तिला लिहिण्याचा छंद जडला. मासिकं, पुस्तके मिळेल ते वाचू लागली. निहाररंजन गुप्त, फाल्गुनी मुखोपाध्याय, निमाई भट्टाचार्य, माणिक बंदोपाध्याय, रवींद्रनाथ, नजरुल, शमसुर रहमान, अल् महमूद यांच्या वाचनाने प्रगल्भ झालेली तसलिमा कॉलेजमध्ये असतानाच ‘सेंजुती' हे काव्यास वाहिलेले हस्तलिखित प्रकाशित करू लागली. यातून तिला ‘रुद्र' भेटला. तो तिचा मित्र, प्रियकर नंतर पती झाला. प्रेम काहींच्या जीवनात पाऊस पडतो, तर काहींच्या जीवनात दुष्काळ. तसलिमाला मात्र प्रेमाने पश्चात्ताप दिला. ती रुद्रच्या सहवासात फुलत, बहरत होती नि एक दिवस तिच्या लक्षात येते की रुद्रच्या अंगाला डेटॉलचा वास येतोय. एव्हाना

वेचलेली फुले/१५३