Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘आमचा सरनामा : नियतीशी करार' - चिंतनिका


 ‘आमचा सरनामा : नियतीशी करार' हा आचार्य शांताराम गरुड लिखित वीस छोटेखानी लेखांचा संग्रह आहे. यास लेखसंग्रहास म्हणण्यापेक्षा ‘चिंतनिका संग्रह' म्हणणे अधिक उचित व्हावे. १५ ऑगस्ट, १९४७ साली आम्ही भारत स्वतंत्र केला. २६ जानेवारी १९५० रोजी आपण राज्यघटना लागू करून, भारत हे 'लोकसत्ताक राष्ट्र घोषित केले. त्या राज्यघटनेच्या सरनाम्यात आम्ही भारताच्या लोकांनी घोषित केले आहे की, “आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि ह्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी या द्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करीत आहोत. सदर सरनाम्याचे वर्णन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा नियतीशी केलेला करार आहे', असे केले होते. स्वातंत्र्याच्या व भारतीय लोकसत्ताकांच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत या सरनाम्यास अनुषंगून येथील नागरिकांनी, केंद्र व राज्य सरकारांनी ज्या गांभीर्याने राज्यशकट चालविला पाहिजे होता, तो न चालविल्याने आज पक्ष, देश, संसदीय कार्यपद्धती, निवडणूक, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, मतदान, मताधिकार इत्यादींच्या अनुषंगाने आचार्य शांताराम गरुड यांच्या मनात जी खंत, खेद, चिंता, शल्य आहे ते त्यांनी सलग वीस लेख लिहून विस्ताराने मांडले आहे.

 या पुस्तिकेचा, चिंतनिकेचा उद्देश भारतीय नागरिक, राज्यकर्ते नि राजकारण्यांत घटनेच्या सहा मूलभूत तत्त्वांप्रत जागरूकता निर्माण करून त्यांना कर्तव्यपरायण करणे हा आहे. सर्वसामान्य नागरिकांत राजकारणाविषयी ‘मला काय त्याचे पडलेय' यासारखा निराशेचा व निष्क्रियतेचा सूर व कर्तव्यच्युती

वेचलेली फुले/१३८