प्राचीन मराठी संत कवयित्रींचे वाङ्मयीन कार्य
प्राचीन मराठी संत कवयित्रीचे वाङ्मयीन कार्य व या कार्याची रसिक चिकित्सा करणारा डॉ. सुहासिनी इलेकरांचा हा प्रबंध एक संशोधनात्मक
आलेख आहे. यात लेखिकेने महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई व वेणाबाई या आद्य कवयित्रींच्या काव्याचे मूल्यांकन तुलनात्मक पद्धतीने केले आहे. या कवयित्रींच्या काव्याची जोपासना समकालीन संतांनी केली आहे. लेखिकेने महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई व वेणाबाई यांच्या काव्याची तुलना अनुक्रमे चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ यांच्या काव्याशी केली आहे. कवयित्रींच्या काव्याचे असे सम्यक, मूल्यांकन अपवादानेच केले जाते. सौ. इलेंकरांनी चाकोरीबाहेर जाऊन चिकित्सक व डोळस दृष्टीने या कवयित्रींचे अध्ययन केले आहे. इस.१३00 ते १७00 या पाच शतकांच्या दीर्घ कालखंडातील ओवीबद्ध, श्लोकबद्ध व अभंग रूपात असलेल्या प्राचीन काव्याच्या अध्ययनाच्या दृष्टीने या ग्रंथाचे एक विशाल दालन अभ्यासासाठी खुले केले आहे. या ग्रंथातील विवेचन चिकित्सक असूनही कुठेही रसग्रहणाच्या दृष्टीने क्लिष्टता आली नाही. याचे सारे श्रेय लेखिकेच्या लेखन शैलीलाच द्यावे लागेल. मराठीतील या संत कवयित्रींची कविता आत्मकेंद्रित होऊन लौकिक सुखदु:खात रेंगाळत न राहता आध्यात्मिक रूप धारण करून मराठी वाङ्मयात मोलाची भर घालते, याचा प्रत्यय जाणून देणारा हा ग्रंथ प्राचीन साहित्याचे अध्ययन करणा-यास दीपस्तंभ वाटला नाही तरच नवल! या ग्रंथास नरहर कुरुंदकरांची विवेचक प्रस्तावना लाभली असून तिच्यामुळे पुस्तकाची कक्षा रुंदावण्यास मदत झाली आहे.
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________________
• प्राचीन मराठी संत कवयित्रींचे वाङ्मयीन कार्य (समीक्षा)
लेखक - ले. डॉ. सुहासिनी इर्लेकर,
प्रकाशक - परिमल प्रकाशन, औरंगाबाद.
प्रकाशन वर्ष - १९८४
पृष्ठे - ३३१ किंमत - ४0 रु.
वेचलेली फुले/१२
पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/13
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे