पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अशिक्षितपणाची, तिच्या भूतकाळात रमण्याची इतिहास कवटाळण्याची लाज वाटते त्यांना आईचे गोडवे गाता येणार नाहीत.

 एखादा मुलगा इतका मोठा होतो की त्याचे सुख हे सोसलेल्या आईस शिक्षा वाटू लागते. उत्तम कांबळे यांनी आपल्या सोसलेल्या आईचे हरेक सोस पुरे केले तरी त्यांना त्यांची आक्का आई सोसता आली नाही. आईला सोसणं हे येरागबाळ्याचे काम नाही. हे सांगणारे सदरचे पुस्तक आई नामक अद्याप न समजलेल्या सात अष्टमांश हिमनगाची एक अष्टमांश कथा. ती पूर्ण कशी होणार? आईचा शोध ही पिढी दरपिढी सतत चालणारी एक प्रक्रिया आहे. याचे भान देणारे हे पुस्तक प्रत्येकानं वाचायला हवे. ते स्वत:ला या पुस्तकाच्या कसोटीवर पारखण्यासाठी हे पुस्तक असा सामाजिक परीस आहे की तुम्ही स्वत:ला त्याच्या कसोटीवर जोखाल तर तुमच्या आयुष्याचे सोने होईल. एका संवेदनशील लेखकाने घेतलेला आईचा हा शोध साहित्यिक निकषापेक्षा माणूसखुणावर पारखण्याचा ऐवज होय. सचित्रतेमुळे हा शोध अधिक बोलका झाला आहे.


• आई समजून घेताना (आत्मकथन)

 लेखक - उत्तम कांबळे
 प्रकाशक - लोकवाड्मय गृह मुंबई
 प्रकाशन वर्ष - २००६

 किंमत १२५ रु.

♦♦

वेचलेली फुले/१२४