मुलांच्या मनात प्रयोगशीलता वाढविणा-या शाळा
हा लेखसंग्रह एका डोळस शिक्षकांच्या सूक्ष्म निरीक्षण नि उपक्रमशील प्रवृत्तीचा आविष्कार आहे. संदर्शन प्रकल्पात शेकडो शिक्षक सहभागी झाले आहेत, परंतु महाडेश्वरांनी हे संदर्शन पर्यटन यात्रा न मानता गुणग्राहकतेस मिळालेली संधी मानली व यातून जितके अधिक मिळविता येईल तितके मिळविण्याचा व मिळालेले समाजापर्यंत पोचविण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याची प्रचिती वाचकाला पानागणिक आल्यावाचून राहात नाही. या पुस्तकास अ. के. भागवतांसारख्या विचारवंताची चिकित्सात्मक, विश्लेषणात्मक प्रस्तावना लाभली आहे. श्री. यदुनाथ थत्तेसारख्या आंतर भारतीला समर्पित झालेल्या एका ज्येष्ठ विचारकाचा पुरस्कार पुस्तकास लाभल्याने या पुस्तका एक आगळे वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. चिकित्सक, चिंतक नि चेतक अशा या त्रयींच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे पुस्तक केवळ वर्णनपर लेखसंग्रह न राहता दृष्टी देणारे पुस्तक बनले आहे.
पुस्तकात गुजरातमधील बाली, मढी, बडोदा, अहमदाबाद, कोबा, आजोल, राजकोट, सणोसरा इत्यादी ठिकाणच्या विविध संस्थांमध्ये चालणाच्या उपक्रम नि प्रयोगाचे धावते वर्णन केले आहे. या विविध ठिकाणी असलेल्या संस्था बालवाडीपासून विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षण देणा-या असून त्यांचे स्वरूप व कार्यही वेगवेगळे आहे. या प्राथमिक, माध्यमिक शाळा आहेत. तशाच आश्रमशाळा, कलाकेंद्र, कृषिसंशोधन प्रकल्प, नागरिक मंडळेही आहेत. प्रत्येक संस्थेचे आपले असे खास व्यक्तित्व आहे. प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र, अभ्यासक्रम, प्रयोग भिन्न आहेत.
वेडछीचे ‘गांधी विद्यापीठ' नई तालीमला समर्पित विद्यापीठ आहे. अहमदाबादचे ‘श्रेयस' तर अनाथांचे आनंदवनच! आजोलचे ‘संस्कारतीर्थ वाचले की रवींद्रनाथांच्या 'शांतिनिकेतन'चे स्मरण व्हावे. सणोसराचे ‘लोक विद्यापीठ' ही लोकशिक्षणाशी व व्यक्तिविकासाशी आपले अतूट नाते स्पष्ट करणारी संस्था आहे. येथील संस्थांच्या नामाभिधानातही कल्पकता आहे. वात्सल्यधाम, संस्कारतीर्थ, कन्याश्रम, बालग्राम, श्रेयस ही नावे वाचली की