आपल्या शाळा किती रूक्ष आहेत याची जाणीव होते. लेखकाने प्रत्येक संस्थेचा स्वतंत्र लेखात परामर्शघेऊन त्या संस्थेची कार्यपद्धती, स्वरूप व वैशिष्ट्ये यांचे मूल्यांकन केले आहे. चित्रशैलीमुळे या संस्था चलतचित्रासारख्या आपल्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात.
एका अर्थाने हे पुस्तक विविध प्रयोग नि प्रकल्पाचा व्यापक संग्रह बनला आहे. ज्या शिक्षकांना आपल्या शाळांतून चैतन्याचे मळे फुलवायचे असतील अशासाठी हे पुस्तक पाथेय ठरावे. झाडूंवरही मुलांनी प्रेम करावे म्हणून तयार केलेले रंगीत झाडू, प्रामाणिकतेचा संस्कार देणारे, विक्रेता नसलेले ‘राम दुकान' जे आपले नाही ते घ्यायचे नाही याची शिकवण देणारी शाळेच्या परिसरात ठेवलेली विविध पात्रे (पॉट्स), सुलभ अवजार निर्मितीचा प्रयोग, वॉटर कर्टन असलेला अभिनय रंगमंच, मुलांच्या मनात प्रयोगशीलता वाढीस लागावी म्हणून मुक्त प्रयोगशाळा असे कितीतरी प्रयोग या पुस्तकात आपणास वाचावयास मिळतात. हे प्रयोग वाचले की आपण किती यंत्रवत झालो आहोत याचा विषाद वाटतो. आहे त्या परिसरात नि आहे त्या परिस्थितीत थोडी कल्पकता दाखवून आपल्या शाळा संवेदनक्षम बनवण्यासाठी हे पुस्तक एका मार्गदर्शकाचे काम करते नि म्हणून आपल्या सर्व शिक्षकांनी हे पुस्तक व्यवसायाचे धडे म्हणून वाचावे व संग्रही ठेवावे.
पुस्तकाच्या शेवटच्या लेखात गुजरातमधील शिक्षण संस्थांची सर्वसामान्य वैशिष्ट्ये अंकित केली आहेत. या शिक्षण संस्थांतून आपण काय घेण्यासारखे आहे याची शिकवण हा लेख देतो. छोट्या छोट्या वाक्य रचनेची हातोटी लेखकात असल्याने या पुस्तकास ‘आँखो देखा हाल' चे स्वरूप प्राप्त झाले आहे. आकर्षक नि समर्पक मुखपृष्ठ लाभलेल्या या पुस्तकात असलेले मुद्रणदोष टाळता आले असते तर बरे झाले असते. पुस्तकाचे शीर्षक व पुस्तकातील लेख यात साधर्म्य असावे असे अपेक्षित असते. शीर्षकावरून गुजरातेतील शिक्षणसंस्थांचा परिचय व्हावा हे उद्दिष्ट स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर ‘सासणगिरीला पाहिलेले दहा सिंह' शीर्षक असलेला लेख अप्रस्तुत वाटतो. हे दहा सिंह वीस लेखात घुसल्याने विनोद निर्माण झाला आहे. हा लेख संपादनाच्यावेळी गाळता आला असता तर बरे झाले असते.
अर्थात असल्या क्षुल्लक दोषांमुळे पुस्तकाच्या मूळ आशयाला मोठा धोका संभवतो असे नाही. या पुस्तकाचे महत्त्व त्याच्या उपक्रमशीलतेतच प्रामुख्याने सामावलेले असल्याने येथून पुढे गुजरात संदर्शनास जाणा-यांना हे पुस्तक जाणीव व दृष्टी देणारे ठरणार आहे. तसेच ते जाण्यापूर्वी एक वैचारिक