पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सुख म्हणजे केवळ स्वहित नव्हे. अन्य जनांचे सुख ते आपले सुख मानण्यातील उदारता अनुभवायला तुमचं मन तसं उमदं असायला हवं. वि. स. खांडेकरांनी आपल्या ‘सुखाचा शोध’ आणि ‘जळलेला मोहर' या कादंबऱ्यांंतून हे परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 'सुख निरपेक्ष सेवेत आहे, सुख जिवाला जीव देणाऱ्या माणसांवर प्रेम करण्यात आहे." असे सुखाचा शोध लावणारे खांडेकर ‘जळलेला मोहर'मध्ये समजावतात, ‘माणसाचा जन्म नुसता सुखासाठी नाही; कर्तव्यासाठी आहे. सेवेसाठी आहे. ज्याला सेवा करायची असेल, त्याला जग मोकळं आहे. सेवेचं सुख हेच अमर सुख आहे... स्त्री-पुरुषांनी कितीही शरीरसुख उपभोगलं तरी त्यांचं कधीही पूर्ण समाधान होणार नाही! याच सुखाच्या मागं माणूस लागला की तो पशू होतो. सेवेतल्या सुखाची गोडी ज्याला कळली तो देव होऊ लागतो. शेवटी माणसानं ठरवायचं की, आपणाला देव व्हायचंय, माणूस व्हायचेय की पशू!
पाशवी शक्ती

 या जगात जी काही दुःखे निर्माण झाली, त्या सर्वांचे मूळ एक तर अहंकारात आहे नाही तर अत्याचारात. शक्ती, सत्ता, संपत्तीचा दर्पच दुःख निर्माण करतो. ही परंपरा प्राचीन आहे. अश्मयुगही त्याला अपवाद नाही आणि आधुनिकपण. याचे कारण त्याचा उगम माणसाच्या अतृप्ततेत आहे. ‘उत्तररामचरित्र'मध्ये एक कथा आहे, क्रौंचवधाची. खांडेकरांनी अशा अनेक कथांना आधुनिक संदर्भ देऊन त्या कथांवर नवभाष्य केले आहे. ‘क्रौंचवध', 'ययाति'सारख्या कादंबऱ्या व रूपक कथांत मिथकीय तत्त्वांचा उपयोग करून खांडेकर कलाकार, तत्त्वचिंतकांची प्रतिभासंपन्नता सिद्ध करतात. ‘क्रौंचवध' कादंबरीचा उत्तरार्ध समाजचिंतनाच्या दृष्टीने पर्वणीच बनून प्रगटतो. ‘क्रौंचवधाचे चित्र... या चित्रात क्रौंच पक्ष्यांच्या जोडप्यातील नराचा आपल्या बाणाने वध करणारा निषाद आहे... जगातील प्रत्येक अन्याय या रानटी भिल्लाच्या रूपाने चित्रकाराने प्रकट केला आहे. त्या निषादापाशी धनुष्यबाण आहेत. प्रत्येक अन्यायाच्या पाठीशी अशीच पाशवी शक्ती उभी असते. ही शक्ती बुद्धीला विचारीत नाही किंवा भावनेला भीक घालीत नाही. संहारक उन्मादाच्या नादात ती तांडवनृत्य करीत सुटते. तिच्या उन्मत्त टाचांखाली चिरडले जाणारे निरपराधी जीव तडफडत, चित्कारत राहतात; पण त्या चित्कारांनी अन्यायी हृदयाला थोडासुद्धा पाझर फुटत नाही. फुटणार कुठून? विनाशातच त्याला आनंद होत असतो. सौंदर्याची मूर्ती छिन्नविच्छिन्न करण्यातच त्याला पुरुषार्थ वाटतो.

वि. स. खांडेकर चरित्र/९७