पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अशा रूपात लेखन करून खांडेकरांनी आपल्या अनुवाद क्षमतेचा परिचय दिला. संस्कृतमध्ये कालिदास, बंगालीतील रवींद्रनाथ टागोर, शरद्चंद्र, हिंदी प्रेमचंद हे त्यांचे आवडते लेखक. विदेशी लेखकांपैकी ओ हेन्री, मोपाँसा, चेकॉव्ह,अन्स्ट टोलर, गॉल्सवार्दी, टॉलस्टॉय, खलील जिब्रान, सॉमरसेट मॉम, हर्बर्ट बेट्स, यांच्या साहित्याचं त्यांनी विपुल वाचन केले होतं.
 ‘सुवर्णकण' (१९४४) हा खलील जिब्रानच्या ३५ रूपककथा नि कवितांचा अनुवाद. 'वेचलेली फुले' (१९४८) मध्ये पण जिब्रानच्या रूपककथांचे अनुवाद आहेत. ‘सुवर्णकण' हा 'Madman'वर बेतले आहे. तर, ‘वेचलेली फुले'मधील कथा 'The fore Runner' (अग्रदूत) मधील निवडक रचना होती. ‘तुरुंगातील पत्रे' हे अन्र्स्ट‌‍ टोलर या जर्मन साहित्यकाराच्या 'Letters From Prison' मधील पत्रांचा मराठी अनुवाद होय. ‘तुरुंग हा भोग नसून भाग्य आहे, असं स्टीफन झ्वाइगला समजाविणा-या टोलरची जीवनदृष्टी या पत्रातून स्पष्ट होते. अन्र्स्ट टोलरच्या I was German' या आत्मकथेचा अनुवाद करण्याची खांडेकरांची इच्छा होती; पण ती अपूर्णच राहिली. टोलरच्या एका कथेचा केलेला अनुवाद ‘सत्य आणि सत्य' मराठी वाचकांच्या परिचयाचा आहे. इसाप, विष्णुशर्मा, टर्जिनिव्ह, इब्सेन, स्टीफन, स्वाईग, कॅपेक हे खांडेकरांचे प्रिय लेखक. त्यांच्या रचनांचे अनुवाद संकल्प खांडेकर नित्य करीत राहायचे.
वक्ते

 वि.स.खांडेकर साहित्यकार म्हणून जसे श्रेष्ठ होते, तसे वक्ते व विचारक म्हणूनही. आपल्या महाविद्यालयीन जीवनात ऐकलेल्या भाषणांमुळे प्रभावित होऊन भाषण करण्याची मनी ऊर्मी असूनही खांडेकरांनी संकोची स्वभावामुळे विद्यार्थिदशेत कधी भाषण केले नाही. सन १९२० साली ते कोकणातील शिरोड्यात शिक्षक म्हणून रुजू झाले. मुख्याध्यापक, शिक्षक या नात्यानं वर्गातील अध्यापनाशिवाय शाळेतील छोट्या-मोठ्या समारंभातील भाषणांनी त्यांची भीड मोडली व ते धिटाईनं भाषणे करू लागले. एकदा शाळेत त्यांनी न्यायमूर्ती रानडे या पुण्यतिथीच्या निमित्ताने इंग्रजीत भाषण दिले. त्याचा वृत्तान्त सावंतवाडीहून प्रकाशित होणाऱ्या ‘वैनतेय' साप्ताहिकात छापून आला होता. तो श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या वाचनात आला. त्याच दरम्यान ते (कोल्हटकर) मुंबई, पुणे,नाशिकच्या दौऱ्यावर असताना खांडेकर त्यांच्यासोबत होते. नाशिक मुक्कामी वसंत व्याख्यानमाला सुरू होती. त्यांना वक्त्याची गरज होती. कोल्हटकरांनी खांडेकरांची शिफारस केली.

वि. स. खांडेकर चरित्र/५९