पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 असे संपादन खांडेकरांनी निबंध व लघुनिबंध संग्रहाचेही केले. ‘नवे किरण' (१९४७) सारखा अनंत काणेकरांच्या लघुनिबंधाचा सुंदर संग्रह खांडेकरांनी संपादित केला. शिवाय प्रातिनिधिक लघुनिबंधकारांचे ‘वासंतिका (१९४९) व ‘पारिजात' (१९४९) सारखे संग्रह संपादित करून आपला लघुनिबंधविषयक दृष्टिकोन स्पष्ट केला. मराठी लघुनिबंधांचे जनक प्रा.ना.सी. फडके असले तरी तो मराठी साहित्यात रुजवायचे, फुलवायचे, विकसित करण्याचे श्रेय खांडेकरांनाच दिले जाते. या संग्रहाच्या प्रस्तावना लघुनिबंधविषयक खांडेकरांची जाण व जाणीव स्पष्ट करतात.
 लघुनिबंधाप्रमाणेच वि.स.खांडेकरांनी काही निबंधसंग्रहही संपादित केले. शि.म.परांजपे यांच्या ‘अग्निनृत्य' (१९४७) शिवाय त्यांनी प्रातिनिधिक निबंधकारांचा एक संग्रह ‘समाजचिंतन' (१९६३) नावाने सिद्ध केला. खांडेकर,साहित्य व समाजाचा अभिन्न संबंध मान्य करीत. ते स्वतः श्रेष्ठ निबंधकार होते. अशा संकलनांच्या संपादनातून खांडेकरांचा समाज व साहित्यविषयक दृष्टीचा परिचय होतो.
 खांडेकरांचा काव्यविषयक व्यासंग सर्वश्रुत आहे. ते जसे कवी होते तसे चित्रपट गीतकारही. मराठी प्राचीन व अर्वाचीन काव्याचा त्यांचा अभ्यास होता, हे ‘तारका' (१९४९) व 'काव्यज्योती' (१९३९) च्या संपादनातून प्रत्ययास येते. खांडेकर नव्या विचारांचे स्वागत व समर्थन करणारे समाजशील साहित्यकार होते. त्यामुळे त्यांनी केशवसुतांची भुरळ न पडती तरच आश्चर्य! 'केशवसुत : काव्य आणि कला'सारख्या ग्रंथांचं त्यांचे व्यासंगपूर्ण संपादन म्हणजे मराठीतील संपादन क्षेत्राचा एक आदर्श असा वस्तुपाठच होय, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. खांडेकरांनी ‘मंगल वाचनमाला' या पाठ्यपुस्तकाचे साक्षेपी संपादन केले आहे.
अनुवादक

 वि.स.खांडेकर साहित्यकार होते; पण त्या आधी ते सव्यसाची वाचक होते. मराठीशिवाय संस्कृत नि इंग्रजीची त्यांना चांगली जाण होती. इंग्रजीत भाषांतरित झालेलं जर्मन,फ्रेंच,रशियन, अरेबिक साहित्य ते आवर्जून वाचत. त्या काळात (स्वातंत्र्यपूर्व) विदेशी साहित्य सामान्यांना सहज उपलब्ध होणे दुरापास्त असायचे. अशा काळात वि.स.खांडेकरांनी भारतीय विशेषतः बंगाली नि विदेशी (इंग्रजी, जर्मन, अमेरिकन) भाषांतील साहित्यकारांच्या स्वतःला भावलेल्या कथा,कविता नि पत्रांचा मराठी वाचकांसाठी वेळोवेळी अनुवाद केला. त्यातून तीन अनुवाद कृती साकारल्या. दोन कथासंग्रह व एक पत्रसंग्रह.

वि. स. खांडेकर चरित्र/५८