मनोगत
‘वि. स. खांडेकर चरित्र' मूळ रूपात सप्टेंबर, २०१२ मध्ये श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूरच्या चरित्र ग्रंथमाला'च्या प्रथम संचात प्रकाशित करण्यात आले होते. ऑक्टोबर, २०१३ मध्ये त्याचे पुनर्मुद्रण करण्यात आले होते. हे चरित्र प्रथम प्रकाशित झाले तेव्हा त्यास डॉ. अनंत व लता लाभसेटवार प्रन्यास, नागपूर आणि लाभसेटवार प्रतिष्ठान, अमेरिकाचे रु. २५०००/- चे अर्थसाहाय्य लाभले होते. आता अक्षर दालन, कोल्हापूरतर्फे त्याची सुधारित तिसरी आवृत्ती येते आहे, त्याबद्दल आनंद असून या चरित्र प्रकाशनास वेळोवेळी साहाय्य करणा-यांचे प्रारंभीच मी आभार मानतो.
मराठी साहित्यात यापूर्वी वि. स. खांडेकर चरित्राच्या अनुषंगाने वा. शि. आपटे, वा. रा. ढवळे, मा. का. देशपांडे, जया दडकर, प्रभृती मान्यवरांनी लिहिले आहे. अलीकडच्या काळात मी वि. स. खांडेकरांच्या समग्र असंकलित, अप्रकाशित साहित्य प्रकाशनाचा जो प्रकल्प हाती घेतला, त्यात कादंबरी, कथासंग्रह, रूपक कथासंग्रह, लघुनिबंधसंग्रह, मुलाखतसंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, व्यक्तिलेखसंग्रह, पटकथासंग्रह आत्मकथनपर लेखसंग्रह अशी वीस पुस्तके प्रकाशित केली आहेत. आणखी कादंबरी, प्रस्तावनासंग्रह, समीक्षासंग्रह, वैनतेय लेखसंग्रह, विनोदी लेखसंग्रह, नाट्यछटा अशी डझनभर पुस्तके प्रतीक्षित आहेत. पैकी निम्मी प्रकाशनाधीन असून निम्मी प्रक्रियाधीन आहेत. दरम्यानच्या काळात वि. स. खांडेकरांची दोन स्मृती संग्रहालये उभारण्यात आली. त्यांत संकल्पना, संशोधन, साधनसंग्रह करण्याचे कार्य मी केले. ही संग्रहालये शिवाजी विद्यापीठ, वि. स. खांडेकर भाषा भवन, कोल्हापूर व वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान, शिरोडे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे आपणास पाहता येतील. या सर्व