पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धडपडीत वि. स. खांडेकर चरित्राचे नवे पैलू उलगडले. काही नवे संदर्भ हाती आले. त्यामुळे चरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाली होती. या काळात वि. स. खांडेकरांचे पुनर्मूल्यांकन झाले होते या अनुषंगाने मी अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून वेळोवेळी लिहिले होते. आकाशवाणी, कोल्हापूरहून काही व्याख्याने ही प्रक्षेपित झाली होती. त्या सर्वांचा सुधारित आवृत्तीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिज्ञासू वाचक, अभ्यासक, संशोधकांसाठी हे पुस्तक म्हणजे अद्यतन संदर्भसाधन बनेल, असा मला विश्वास वाटतो.
 मूळ चरित्र लिहिले तेव्हा तरुण वाचकवर्ग माझ्यासमोर होता. पुनर्मूल्यांकन प्रकरणात जे सात-आठ लेख अंतर्भूत करण्यात आले आहेत, त्यात काही ठिकाणी पुस्तकाकारात द्विरुक्ती वाटली तरी त्या त्या प्रकरणाची गरज म्हणून ती आहे तशीच ठेवली आहे. संपादनात ते टाळणे खरे तर शक्य होते, पण मग तिथे उणीव भासू लागते, विषयविस्तार व विवेचनात अपुरेपण येते. त्यामुळे तुटक संदर्भ परिपूर्ण होण्यास साहाय्यही होते असे वाटल्यावरून मूळ लेखातील मजकूर तसाच ठेवला आहे.
 ‘वि. स. खांडेकर चरित्र'चे जे रूप आकाराला आले आहे, त्यामुळे खांडेकरांचं जीवन, कार्य, विचार, मूल्य, साहित्य, दृष्टिकोन इत्यादीविषयी एक व्यापक दृष्टी व आकलन विकसित होते. त्यामुळे खांडेकर हे केवळ मराठी साहित्यिक न राहता ‘आंतरभारती' रूपाने ‘भारतीय साहित्यिक बनून पुढे येतात. भारतीय ज्ञानपीठाने मराठीचा पहिला पुरस्कार सन १९७४ साठी आपल्या दशकपूर्तीच्या निमित्ताने बहाल करून मोठे औचित्य साधले आहे. वि. स. खांडेकर 'माणूस' म्हणून जितके मोठे होते तितकेच त्यांचे साहित्य ‘मानवधर्मी' होते. मानवी जीवनाच्या विविध प्रश्न व समस्यांचा ऊहापोह करताना खांडेकर जे विचार व्यक्त करतात, त्यांचे ते चिंतन मानवजातीच्या अंतिम कल्याणाचे अमर भाष्य बनून जाते. या साहित्याचे चिरंतनत्व या अजरामर चिंतनात सामावलेले आहे. ते व्यक्त करताना खांडेकर ज्या उपमा, उत्प्रेक्षा, रूपकांचा प्रयोग करतात, भाषिक सौंदर्याचा जो साज चढवितात, त्यामुळे त्यांचे साहित्य एकाच वेळी ललित, मनोहर व विचारोत्तेजक बनत असते. त्यामुळे ते वाचकावर आपल्या शब्द सौंदर्य व विचार सामर्थ्याची मोहिनी घालत त्याला अंतर्मुख करते. त्यामुळे वि. स. खांडेकर साहित्याचे वाचन शिळोप्याचा उद्योग न होता सजग परिवर्तनाचे