पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(इ) वि. स. खांडेकर : सार्वकालिक साहित्यिक


 मराठी भाषा व साहित्यास पहिले भारतीय ज्ञानपीठ मिळवून देणारे साहित्यिक म्हणून मराठी सारस्वतात वि. स. खांडेकरांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते भारतीय साहित्यिक म्हणून ओळखले जाणारे एक महत्त्वपूर्ण साहित्यिक होत. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, रूपककथा, पटकथा मराठीपलीकडे कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, सिंधी, उर्दू, बंगाली इ. भारतीय भाषांत अनुवादित झाल्या आहेत. पैकी गुजराती, तमिळमध्ये तर खांडेकर त्या भाषेचे लेखक म्हणून ओळखले जातात. याचं कारण त्यांच्या साहित्यातील समाजभान, मूल्यनिष्ठा, मिथकांची आधुनिक चिकित्सा, भाषासौंदर्य होय. हे वर्ष त्यांच्या चित्रपट सृष्टीच्या पदार्पणाचे अमृतमहोत्सवी वर्ष होय. त्यानिमित्ताने वि. स. खांडेकरांच्या साहित्याचं मृत्युंजयी स्वरूप समजून घ्यायला हवं.

 ही गोष्ट असावी सन २००१ ची. ते वि. स. खांडेकरांचे ‘रजत स्मृती वर्ष' होते. माझ्या हाती जया दडकर यांनी संपादित केलेली ‘वि. स. खांडेकर वाङ्मय सूची' आली. ती अभ्यासत असताना असं लक्षात आलं की, खांडेकरांचे बरेच साहित्य असंकलित आहे. ते मिळवून संपादित, प्रकाशित करण्याचा विचार मनात आला. मी वि. स. खांडेकरांची कन्या श्रीमती मंदाकिनी खांडेकर यांच्याकडे ही कल्पना मांडली. त्यांनी प्रकाशनाची परवानगी तर दिलीच; पण वि. स. खांडेकरांचं अप्रकाशित काही साहित्यही उपलब्ध करून दिले. त्यामुळे मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेच्या अनिलभाई व सुनीलभाई मेहतांमुळे गेल्या दशकात मराठी वाचकांना मी खांडेकरांची नवी पुस्तके उपलब्ध करून देऊ शकलो. त्यात १ कादंबरी, ४ कथासंग्रह, १ रूपक कथासंग्रह, ४ लघुनिबंधसंग्रह, ३ वैचारिक लेखसंग्रह, २ आत्मकथने, १ मुलाखतसंग्रह, १ पटकथासंग्रहाचा समावेश आहे.

वि. स. खांडेकर चरित्र/११४