पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 पालकांची मने वळवीत. घरी जाऊन विनंती करीत. मुलींना बाजाररस्त्याने शाळेस येणे जड जायचे. त्या आडवाटेने शाळेत येत असत. वि. स. खांडेकरांनी केशवसुतांची कविता 'तुतारी' ‘सावळ्या तांडेलाची गोष्ट', ‘फ्रेंच राज्यक्रांती विद्यार्थ्यांना शिकविली. त्या शिकवणीने विद्यार्थ्यांची आयुष्यभर पाठराखण केली. मुलांसाठी ग्रंथालय, जिमखाना, क्रिकेट, बालवीर पथके (स्काऊट) सुरू केले. सुट्टीतील वर्ग हे खांडेकर मास्तरांचे आगळे वैशिष्ट्य! या तासांना घंटेचे बंधन नसायचे. मनसोक्त शिकविण्याकडे त्यांचा कल असायचा. शिकविताना अवांतर म्हणून सांगितलेल्या गोष्टींमुळे विद्यार्थी बहुश्रुत होत. शिकवणं हितगुज असायचे. ऐकत विद्यार्थ्यांची समाधी लागायची.

 वि. स. खांडेकर सन १९३८ ला चित्रपट लेखनासाठी कोल्हापूरला गेले. नंतर एक-दोनदा शिरोड्याला येणे घडले ते समारंभ, सत्काराच्या निमित्ताने. सन १९७१ ला ते शिरोड्यात अनेक वर्षांनी आले. निमित्त ‘वैनतेय' सत्काराचं. त्यास जोडूनच ते शिरोड्यात आले होते. शिरोडकरांनी त्यांची मोठी सवाद्य मिरवणूक काढली. मोठा जाहीर सत्कार केला. आरवलीच्या घरी येऊन ते सुखावले. म्हणाले, 'आज खूप वर्षांनी आरवलीतल्या घरी आलो. ‘उल्का', 'वत्सला' पुन्हा भेटल्या. (या नायिका याच घरात जन्मल्या) ते हिरवेगार दिवस आयुष्याच्या हिवाळ्यात फुलले. आजच्या शिरोड्यावर एक कादंबरी लिही असे कानांत गुणगुणत निघून गेले.' जाहीर सत्कारास उत्तर देताना त्यांनी शिरोडकरांना आवाहन केले, ‘जे बदलायचे, घडवायचे ते स्वतः; भारतीय जीवनातील द्वितीय पुरुष आता संपवा. विज्ञानाच्या झंझावाताने माणुसकीचा दिवा विझू देऊ नका.' ही त्यांची शिकवण अमलात आणणे हेच या शाळेच्या शताब्दी वर्षाचे लक्ष्य असले पाहिजे. तोच आपला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संकल्प व आचारधर्म बनायला हवा.

वि. स. खांडेकर चरित्र/११३