पान:विश्व वनवासींचे.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मनोगत

 “विश्व वनवासींचे" हे माझे वनवासी विषयाला वाहिलेले दुसरे पुस्तक आहे. “आरसा आदिवासी जीवन शैलीचा" या पूर्वीच्या पुस्तकाची उपयुक्तता आजही तेवढीच आहे. वनवासी लोकजीवन आणि संस्कृतीच्या जिज्ञासेपोटी, नागरीजनांनी ती जाणून घेण्याची आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याची नितांत गरज आहे. हे लक्षात घेऊन या वनवासीविषयक लेख संग्रहाचे प्रकाशन केले आहे. हा लेखसंग्रह सर्व वनवासी अभ्यासकांना, संशोधकांना उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.

 प्रस्तुत ग्रंथात वनवासींच्या अनेक लक्षित आणि अलक्षित पैलूंना विश्व वनवासींचे जाणून घेताना उजळा देण्याचा प्रयत्न केला आहे. वेळोवेळी झालेले हे लेखन येथे एकत्र आणल्याने अभ्यासकांना, नगरवासीयांना ते उपयुक्त ठरणार आहे. हे लेखन प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे त्यामुळे त्यात एक जिवंत रसरशीतपण अवतरले आहे. त्यातून वाचकांना वनवासी बंधू भगिनींची मानसिकता, स्थितीगती लक्षात येईल.

 यातील बहुतेक लेख पूर्वी विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत, पण या विखुरलेल्या लेखनाला एकत्र आणणे अत्यावश्यक वाटले, त्याला उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे, त्यासाठी नवभारत (वाई), परामर्श (पुणे), शिक्षण आणि समाज (पुणे), शिक्षण समीक्षा (नागपूर), जनस्थान (नाशिक), शब्ददर्वळ (इंदोर), भा.वि.सा. (पुणे), वनवार्ता (नाशिक), मयुरवृत्त (नाशिक), वनपुण्याई (पुणे), लोकप्रज्ञा (औरंगाबाद), सा. विवेक, भूषणराज, सांस्कृतिक वार्तापत्र, समरसता पत्रिका, या सर्व नियतकालिकांच्या संपादकांचे, प्रकाशकांचे, संदर्भदात्यांचे मी मनापासून ऋण मान्य करतो. नाशिक, पुणे, मुंबई आकाशवाणीचा, त्याचप्रमाणे विविध ठिकाणी लोक साहित्यावर चर्चासत्रे, व्याख्याने आयोजकांचा, ग्रंथ प्रविष्ट प्रस्तावना-लेख प्रसिद्ध करणाऱ्यांचाही मी आभारी आहे.